अंगावर काटा आणणारी प्रसुतीची घटना गोवा एक्स्प्रेस मध्ये घडली
कोपरगाव प्रतिनिधी, दि. २३ : ‘देव तारी त्याला कोण मारी’ याची प्रत्यक्ष अनुभुती कोपरगावच्या लेकीला आली. प्रसुतीची वेळ नाही, प्रसुतीला तब्बल एक महीना बाकी आहे. पती-पत्नी दोघेही वैद्यकीय क्षेत्रातील आहेत. भाऊ डॉक्टर आहेत. वेळेवर औषधोपचार सुरु आहेत. वेळेवर तपासण्या केल्या. कोणताही धोका नाही म्हणून रेल्वेने सुखरुप प्रवास करण्यासाठी सर्वात जलद गोवा एक्स्प्रेसने कोपरगावच्या दिशेने प्रवास करण्यासाठी बसलेल्या सोनाली गाढे यांचा प्रवास जीवघेणा होईल याची कोणालाही शंका नव्हती. देव तारी त्याला कोण मारी याचा अनुभव सोनाली गाढे यांनी बुधवारी अनुभवला…! त्यांच्या लहान परीमुळे जीवदान मिळाले
एक्स्प्रेस रेल्वेने प्रवास करताना अचानक प्रसुती वेदना होवू लागल्या आणि सोबत असलेल्या पाच वर्षाच्या परीने प्रसंगावधान दाखवून आपल्या आईच्या वेदना नातेवाईकांना कळवून एका धोकादायक घटनेतून आपल्या आईचे व नवजात बालकाचे प्राण वाचवले.
चित्तथराक व चिञपटाला लाजवेल अशा या घटनेची अधिक माहिती अशी की, कोपरगाव हे माहेर असलेल्या सोनाली सतिश गाढे ह्या आपल्या पतीसह गोवा येथे एका वैद्यकीय खाजगी कंपनीत कामाला आहेत. त्यांना परी नावाची ५ वर्षाची एक मुलगी आहे. सोनाली ह्या दुसऱ्यांदा गरोदर असुन त्यांना आठवा महीना लागल्याने त्या प्रसुतिसाठी आपल्या माहेरी कोपरगावकडे गोव्याहून २२ नोव्हेंबर रोजी मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता गोवा- निजामुद्दीन एक्सप्रेस या रेल्वेत बसल्या त्यांच्या सोबत त्यांची आई लता सुधाकर नरोडे वय ५५ वर्षे व त्यांची पाच वर्षाची मुलगी परी उर्फ सर्वज्ञा ही होती.
गोव्यापासुन प्रवास सुखरुप सुरु झाला, माञ बुधवारी पहाटे रेल्वे पुण्यापासून पुढे लोणी काळभोर पर्यंत आली आणि सोनाली सतिश गाढे यांच्या पोटात अचानक वेदना सुरु झाल्या. प्रसुतीचा महीना बाकी असताना पोटात दुखत असल्याने नक्की काय होते हे कळण्याच्या आतच पुन्हा जोरात प्रसुतिच्या कळा सुरु झाल्या. एका बाजुला कडाक्याची थंडी, वाऱ्यासारखी धावणारी रेल्वे आणि पोटात प्रसुतिच्या वेदना सुरु झाल्याने काय करावे कळत नव्हते. बेशुद्ध अवस्थेत सोनाली तळमळत होत्या.
लांबचा प्रवास असल्याने रेल्वेतील प्रवासी पहाटेच्या साखरझोपत होते पण सोनाली यांची छोटी परी माञ आईची तळमळ पहात जागी होती. परीने आईच्या मोबाईल वरुन आपल्या मामाला फोन लावला. डॉ. सागर नरोडे हे परीचे मामा त्यांना परीने रेल्वेतील घटनाक्रम सांगुन आईच्या अवस्थेचे गांभिर्य योग्य शब्दात सांगितले. डॉ. नरोडे यांना आपल्या बहीणीची अवस्था धोक्यात असल्याचे लक्षात येताच संबधीत रेल्वेतील प्रमुखांशी बोलून रेल्वे थांबवण्याची विनंती केली. रेल्वे तोपर्यंत पुण्याच्या पुढे गेली होती.
रेल्वेत वैद्यकीय सेवा मिळण्याची शक्यता नव्हती. माञ सोनाली यांची अवस्था अतिशय बिकट होत असल्याचे वारंवार परी सांगत होती. अखेर डॉ. नरोडे यांनी दौंड येथील त्यांचे मिञ डॉ. विक्रम दिवेकर यांना फोन करुन घटनेची माहीती दिली. पण रेल्वे दौंडपर्यंत येण्याच्या आगोदर काहीही होवु शकते याची कल्पना परीने मामाला दिल्याने सोनाली यांचा धोका वाढल्याचे लक्षात आले. दौंड रेल्वे स्टेशनच्या आगोदर असलेल्या केडगाव रेल्वे स्टेशनवर गोवा एक्स्प्रेस थांबवण्याची विनंती केडगाव स्टेशन मास्तरला केली. स्टेशन मास्तर अभिजित मेहरुळ यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून माणुसकी दाखवली.
स्टेशन मास्तरच्या मदतीने थांबा नसतानाही केडगाव येथे गोवा एक्स्प्रेस पहाटे साडेपाचवाजता थांबवण्याची व्यवस्था केली. डॉ. विक्रम दिवेकर यांनी फोनवरून डॉ. गिताराम वाकचौरे यांना घटनाक्रम सांगितला. क्षणाचाही विलंब न करता डॉ.गिताराम वाकचौरे यांनी स्वतः एक रिक्षाची व स्टेचरची व्यवस्था करुन रेल्वे पटरीच्या बाजुला थांबले. जर रूग्णवाहीकेमध्ये घेवून जाण्याची व्यवस्था केली असती तर रेल्वे पटरीजवळ रुग्णवाहिका जाणार नव्हती व तिन किलोमिटर पुलाला वळसा घालुन येईपर्यंत उशिर होवू शकतो याचा विचार करुन रिक्षा करण्यात आली.
रेल्वेत आईला त्रास होतो हे बघून परी कासावीस झाली. परीने डॉक्टरांना पाहिजे त्या फाईल दाखवणे, संबंधित नातेवाईकांना फोन करणे हे सगळं एवढ्याशा परीने केले. परीने दाखवलेल्या तत्परतेचे आम्हाला कौतुक वाटते अशी भावना परीच्या मावशी व कोपरगाव नगरपालीका शाळेतील शिक्षीका मंगल पवार यांनी व्यक्त केल्या.
रेल्वेतून सोनाली यांना तातडीने खाली उतरवून रेल्वेच्या पटडीवरुन स्टेचरच्या मदतीने रिक्षातुन डॉ. निवेदिता वाकचौरे यांच्या चिरायु हाॅस्पिटलमध्ये दाखल केले. तत्पूर्वी परीने आपल्या आईच्या गरोदरपणातील तपासण्या केलेले कगदपञ दाखवत डॉक्टरांना योग्य मदत करीत होती. हाॅस्पिटलमध्ये दाखल करताच काही क्षणाचाही विलंब न होता सोनाली गाढे यांची प्रसुती डॉ. वाकचौरे यांनी धोकादायक अवस्थेत असुनही साध्या पध्दतीने करून बाळासह आईला जीवदान दिले. काही क्षणाचा विलंब झाला असता तर काहीही होवू शकले असते. आपल्या आईने प्रवासादरम्यान एका बाळा सुखरुप जन्म दिल्याची गोड बातमी सुध्दा परीने सर्व नातेवाईकांना आनंदाने सांगितली.
दरम्यान आपली बहीण संकटात असल्याचे पाहून भाऊ डॉ. सागर नरोडे हे नाशीक येथुन केडगावला सकाळी पोहचले नवजात बाळाची व बहीणीची तब्बेत सुखरुप असल्याची माहीती कळवून देवदूतासारखे धावून आलेल्या रेल्वे स्टेशन मास्तर अभिजित मेहरुळ व सर्व डॉक्टरांचे आभार व्यक्त केले पण विशेष कौतूक परीचे केले. ते म्हणाले परीमुळे माझ्या बहीणीला अर्थात परीच्या आईला व नव्या बाळाला नवा जन्म दिला तसेच माझ्या बहीणीचा नवा जन्म झाला. परीच्या समयसूचकतेमुळे आज माझी बहीण व बाळ सुखरुप आहे अशी प्रतिक्रिया लोकसंवादशी बोलताना व्यक्त केली.
रेल्वे प्रवासादरम्यान संकटाकालीन प्रसुतीतून सुखरुप प्रसुती झाली. परीच्या जोडीला लहान बहीण जन्माला आली. आईसह नवजात बालीका सुखरुप कोपरगावच्या दिशेनेत येणार आहेत.