शेवगाव प्रतिनिधी, दि. २३ : तालुक्यातील १२ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी जनतेतून थेट सरपंच पदासह निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून यातील १२ पैकी १० ग्रामपंचायतीवर महिलांची सरपंच पदी जनतेतून वर्णी लागणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत अनेक ग्रामपंचायतीवर महिला राज अवतरणार आहे.
या निवडणुकीसाठी येत्या २७ नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल होण्यास सुरुवात होणार असल्याने या गावात निवडणूक रणधुमाळी सुरु झाली असून ऐन थंडीच्या कडाक्यात गाव पातळीवरील राजकारण ढवळून निघण्यास सुरुवात झाली आहे.
ग्रामपंचायतीचा कारभार बहुतेक ठिकाणी पुरुष मंडळी हाताळताना दिसतात. परंतु या निवडणुकीत १२ पैकी १० ग्रामपंचायतीचे सरपंच महिलांसाठी आरक्षित असून सरपंच पदाची निवड थेट जनतेतून होणार असल्याने गावची धुरा सांभाळणाऱ्या गावकारभाऱ्याना आता आपल्या पत्नीला, मुलीला वा सुनेला निवडणुकीच्या रिंगनात उतरवावे लागणार आहे. मात्र आपल्या मंडळाच्या प्रचारासाठी कार्यकर्त्यांची जमवाजमाव ते मतदान संपेपर्यतची सर्व प्रक्रिया गावकारभा-यांना सांभाळण्याची वेळ आली आहे.
तालुक्यातील जोहरापूर, खामगाव, प्रभूवाडगाव, भायगाव, रावतळे कुरुडगाव, रांजणी, दहीगाव ने, वाघोली, आखेगाव, अमरापूर, सुलतानपूर खुर्द, खानापूर, अशा १२ गावच्या निवडणुकीसाठी येत्या २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करणे, ५ डिसेंबरला छाननी, ७ डिसेंबरला माघार व चिन्ह वाटप, त्यानंतर १८ डिसेंबरला मतदान होणार असून दि.२० डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
या निवडणुकीत राष्ट्रवादी व भाजपमध्ये सामना रंगण्याची चिन्हे आहेत. यातील बहुतांशी ग्रामपंचायतीवर सध्या राष्ट्रवादीचे माजी आमदार डॉ.नरेंद्र पाटील घुले, माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांच्या गटाचे वर्चस्व आहे. तसेच वरील गावच्या सरपंच पदाची निवड थेट जनतेतून होणार असल्याने यंदाची निवडणूक चुरशीची व अटीतटीची ठरण्याची चिन्हे आहेत.
राज्यात सत्तांतर होवून नव्याने उदयास आलेली राजकीय समीकरणे लक्षात घेता भाजप जोरदार मुसंडी मारण्याची शक्यता नाकारता येणार नाही . राष्ट्रवादी व भाजपात तुल्य बळ लढतीचे संकेत असले तरी शिवसेना उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री शिंदे प्रणीत शिवसेना, कॉंग्रेस, मनसे, वंचित बहुजन आघाडी, जनशक्ती आघाडी, स्वाभिमानी शेतकरी पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष व विविध राजकीय पक्षांची भूमिका सुद्धा महत्वपूर्ण ठरणार आहे.