कोपरगाव प्रतिनिधी, दि. ०८ : चासनळी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकारी हजर नसल्यामुळे कारवाडी येथून प्रसुतीस आलेल्या रेणुका किरण गांगुर्डे या महिलेवर वेळेत उपचार न झाल्याने अती रक्त स्रावामुळे सदर महिलेचा मु्त्यु झाल्याने, संबंधित वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांचेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्यासाठी विविध सामाजिक संघटनेच्या वतीने तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे कि, कारवाडी येथील रहिवासी अशोक राणु वाघ यांची मुलगी रेणुका किरण गांगुर्डे हि द्वितीय प्रसुतीसाठी माहेरी आलेली होती. ३ ऑगस्ट रोजी सकाळी साडेआठ वाजता रेणुका हिस प्रसुती कळा चालु झाल्याने, तिला चासनळी प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसुतीसाठी नेण्यात आले, त्या ठिकाणी नेमणूकीस असलेल्या, परिचारिका यांनी डॉक्टर उपलब्ध नसल्याचे कारण देत, धामोरी उपकेंद्रात नेण्याचे सांगण्यात आले. वाघ यांनी अँम्बुलन्सची मागणी केली असता, वाहणास डिझेल उपलब्ध नसल्याचे सांगितले. अशोक वाघ यांनी मुलीस खाजगी वाहणातुन धोमोरी उपकेंद्रात दाखल केले.
बाळाच्या प्रसुती नंतर अतीरक्त स्रावामुळे काही वेळात रेणुका हीचा मृत्यू सरकारी यंत्रणेच्या निष्क्रिय कारभारामुळे झाल्याने, आखिल भारतीय ओ.बि.सी. सेवा संघाचे राज्य उपाध्यक्ष अंबादास धनगर यांच्या नेतृत्वाखाली प्रहार जनशक्ती संघटनेचे किसन सोनवने, दत्तात्रय भोसले, सागर आहिरे, आमन मनियार, सुनील कोळपे, रमेश पवार, अमित आगलावे सामाजिक कार्यकर्ते रमेश भोंगळ आदिनी निवेदन दिले.
दोषी अधिकाऱ्यावर कारवाई होवुन, संबंधित कुटुंबास शासनाच्या वतीने नुकसान भरपाई मिळुन जन्मलेल्या बालकाचे पालन पोषणाची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्याच्या पगारातून करण्याची मागणी करण्यात आली.
या अगोदर चासनळी प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर उपलब्ध नसल्याने, महिलेची प्रसुती उघड्यावर झाली होती. वरिष्ठांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली असती तर आज आरोग्य खात्याच्या ढिसाळ कारभारामुळे महिलेचा म्रुत्यु झाला नसता. असा आरोप सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आला.