शेवगाव प्रतिनिधी, दि. १ : माहूरगड निवासीनी श्री रेणुकामातेचे जाज्वल्य ठाणे असलेल्या श्री क्षेत्र अमरापूर येथील श्री रेणुकामाता देवस्थानात भाविकांसाठी उभारलेल्या दहा हजार चौरस फूट क्षेत्रफळाच्या अद्ययावत भव्य तीन मजली भक्तनिवास व प्रसादालयाची वास्तुशांती उद्या शुक्रवारी ( दि २ ) आयोजित केली असून यानिमित्त आयोजित कार्यक्रमास व स्नेहभोजनासाठी भाविकांनी अवश्य यावे. असे आवाहन रेणुका भक्तानुरागी मंगलताई चंद्रकांत भालेराव यांनी केले आहे.
उद्या सकाळी ८ ला तारकेश्वर गडाचे महंत शांती ब्रह्म आदिनाथ महाराज शास्त्री हनुमान टाकळीचे महंत रमेश आप्पा महाराज तसेच जोग महाराज संस्कार केंद्राचे प्रवर्तक राम महाराज झिंजुर्के यांच्या हस्ते या भव्य वास्तूचे उद्घाटन होणार आहे त्यानंतर सकाळी साडेअकरा ते सायंकाळी साडेपाच पर्यंत सहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे.
येथील श्री रेणुकामाता देवस्थानात आईसाहेबाचे अतिशय भव्य मंदिर असून त्यापुढे अडीच हजार चौरस फुट क्षेत्रफळाचा सभामंडप, प्रदाक्षिणा मार्गावर गणपती, महादेव , दत्त, महालक्ष्मी, तुळजाभवानी, हनुमान, अनुसया, अत्री ऋषी, जमदग्नी ऋषी , काळभैरव आदि लहान मोठी १२ मंदिरे आहेत. देवस्थानाच्या प्रवेश दारात उजव्या बाजूला देवस्थानाची गोशाळा तर डाव्या बाजूस सोळाखांबी अष्टकोनी मोठा यज्ञ मंडप आहे. त्यापुढे काही अंतरावर रेणुका भक्तानुरागी स्व . चंद्रकांत दादा भालेराव यांची समाधी आहे.
मागील बाजुस ब्रम्हवृंदाची निवासस्थाने आहेत. या इमारती शेजारी जुने प्रसादालय होते. कोविडच्या काळात ते बंद झाले. याच जागेवर अल्पावधीत मोठे तीन मजली भक्तनिवास व प्रसादालय उभारण्यात आले आहें. गेल्या काही वर्षात देवस्थानात नियमीत येणाऱ्या भाविकांची संख्या मोठया प्रमाणात वाढल्याने भाविकांच्या निवासाची स्वतंत्र सोय करण्यात आली. तसेच दररोजच्या व पौर्णिमेच्या नियमित भंडाऱ्यासाठी खालच्या मजल्यावर प्रशस्त प्रसादालय हॉल बांधण्यात आले आहे.