शेवगाव प्रतिनिधी, दि. १४ : जिल्हातील स्वस्त धान्य दुकानदारांना येणाऱ्या विविध अडचणींतून मार्ग काढण्याबाबत जिल्हा पुरवठा विभागाने स्वस्त धान्य दुकानदारांना योग्य ते सहकार्य व मार्गदर्शन करण्याची मागणी करणारे निवेदन स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या जिल्हाध्यक्षा श्रीमती मीनाताई कळकुंबे, तालुकाध्यक्ष पोपटराव पाखरे, यांच्यासह जिल्हा व तालुका संघटनेच्या पदाधिकारी सदस्यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी यांना दिले आहे.
या संदर्भात संघटनेचे तालुकाध्यक्ष पाखरे यांनी माहिती दिली. तालुक्यातील विविध स्वस्त धान्य दुकानात सप्टेंबर महिन्याचे नियमित व प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचे धान्य डिसेंबर महिना संपत आला तरी अद्याप स्वस्त धान्य दुकानामध्ये आलेले नाही. सप्टेंबर महिन्याचे धान्यच पॉज मशीनमध्ये आलेले नाही. त्याचे वाटप करण्याकामी जिल्हा पुरवठा विभागाकडून कार्यवाही करण्यात यावी. अंत्योदय योजना (गरीब कल्याण योजना), मोफत देण्यात येणारा गहू गेल्या जानेवारीपासून लाभार्थ्यांना मिळालेला नाही. त्या संदर्भात जिल्हा पुरवठा विभागाकडून सत्वर कारवाई करण्यात यायला हवी.
शासकीय गोडावून मधून गहू तांदूळ स्वस्त धान्य दुकानदारांना वेळेत पोहोच झाला पाहिजे. स्वस्त धान्य दुकानात संबधित माल आल्यानंतर तो पॉज मशीनवर लगेच अपलोड करण्यात यावा, गोडावून मधून धान्य देतांना दुकानदारांना ते धान्य मोजून देण्यात यावे, पॉज मशीन मध्ये येणारी सर्व्हरची समस्या तातडीने सोडवण्यात यावी, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत देय असलेली रक्कम त्वरित संबधितांच्या खात्यावर जमा करण्यात यावी, सध्या डिसेंबर महिना सुरु आहे.
मात्र सप्टेंबर महिन्याचे धान्य अद्याप उपलब्ध नसून पॉज मशीनला नसल्याने याबाबत वरिष्ठ विभागाकडून पाठपुरावा करण्यात यावा. तसेच माहे जुलै २०२२ पासून नियमित अंत्योदय लाभधारकांना विकत देण्यात येणारा गहू पूर्ण तालुक्याला मिळालेला नाही. तसेच ज्या महिन्यात नियमित व मोफत गहू आणि तांदूळ दुकानदारांना मिळतो त्या प्रमाणे पॉज मशीनला वाटपाचा पर्याय देण्यात यावा. आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्याची माहिती यावेळी पाखरे यांनी दिली.