अमोल निर्मळ राज्यस्तरीय प्रथम पारितोषिकाने सन्मानित

 ५५० चित्रकारांमधून निर्मळ ठरले सर्वोत्तम चित्रकार

कोपरगाव प्रतिनिधी दि.१६ :  राज्यभरातील नामवंत तब्बल साडे पाचशे चिञकारामध्ये कोपरगाव येथील डॉ. सी. एम मेहता कन्या विद्यालयाचे कला शिक्षक व प्रसिद्ध चिञकार अमोल निर्मळ यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देवून माजी मंञी छगन भुजबळ यांच्या हस्ते गौरविण्यात आले. 

 कलेचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या नाशिक येवला मध्ये साहित्य कला व सांस्कृतिक  विभागा मार्फत राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी राज्यभरातून ५५० चित्रकारांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत कोपरगाव येथील रयत शिक्षण संस्थेचे डॉ. सी. एम. मेहता कन्या विद्या मंदिर मधील कलाध्यापक अमोल बाळासाहेब निर्मळ यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक जाहीर झाले आहे.

या पारितोषिकाचे स्वरूप रोख ११हजार १११ रूपये, सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र असून त्यांना ते पारितोषिक येवला येथील एका भव्य कार्यक्रमात राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले आहे. निर्मळ यांनी मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक, सोलापूर, अहमदनगर अशा राज्य भरातील ५५० चित्रकारांमधून प्रथम येण्याचा मान मिळवला आहे या स्पर्धेचे परीक्षण ज्येष्ठ चित्रकारांच्या मंडळांनी केले आहे. त्यांनी यामध्ये चित्रकाराची कलात्मक उंची, रसिकांचा प्रतिसाद, राज्य पातळीवरील कला क्षेत्रातील योगदान व चित्रकाराची प्रयोगशीलता आदी निकषांच्या आधारे प्रथम ३ सर्वोत्कृष्ठ चित्रकारांची निवड करण्यात आली होती.

परीक्षक मंडळाने एकमताने प्रथम क्रमांकाच्या पारितोषिकसाठी अमोल निर्मळ  कोपरगाव जि. अहमदनगर यांची निवड केली तर व्दितीय क्रमांक किशोर पगारे नाशिक व तृतीय क्रमांक विठ्ठल गायकवाड मुंबई यांचा समावेश आहे. या अगोदरही निर्मळ यांना राज्यस्तरीय अनेक पारितोषिके मिळालेली आहे. त्यांच्या या निवडी बद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

 दरम्यान अमोल निर्मळ यांनी यापुर्वीही देशासह राज्यातील व जिल्ह्यातील विविध मान्यवरांचे तैलचित्र  हुबेहूब काढले आहेत.  विवीध क्षेञात काम करणाऱ्यांचे चिञ काढून अमोल निर्मळ यांनी व्यक्ती चित्रांचा विक्रम केला आहे. निर्मळ यांच्या कलेचा संपूर्ण कोपरगाव तालुक्यासह अहमदनगर जिल्ह्याला अभिमान वाटावा अशी त्यांची चिञकला आहे.