शिर्डी प्रतिनिधी, दि.२३ : कोपरगाव येथील पर्यावरण प्रेमी व स्वच्छतादूत सुशांत घोडके यांच्या पत्राची दखल घेत नाशिक
विभागीय आयुक्तालयाने नायलॉन धागा विक्रेते यांचेवर कारवाई बाबत लेखी सूचना दिल्या आहेत.
नाशिक विभागीय आयुक्तालयातील उपायुक्त रमेश काळे यांनी नाशिक, जळगांव, धुळे, नंदुरबार, अहमदनगर या जिल्ह्यात जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, महापालिका आयुक्त आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना नायलॉन धागा विक्रेते
यांचेवर कारवाई बाबत लेखी सूचना दिल्या आहेत. मकरसंक्रांत निमित्ताने पतंगबाजी करुन उत्सव साजरा केला जातो. आपलाच पतंग दिर्घकाळ हवेत राहावा या स्पर्धेतून गत १५ वर्षापासून नायलॉन धागा वापरण्यास पतंगोत्सवात सुरूवात झाली आहे. यामुळे मनुष्य, पशू-पक्षी यांना गंभीर शारीरिक इजा तथापि काही ठिकाणी जीव गमविण्याच्या घटनाही घडलेल्या आहेत.
पतंगासह ते सर्व तुटलेले नायलॉन मांजाच्या धाग्याचे तुकडे जमिनीवर पडतात. हे तुकडे विघटन होण्याजोगे नसल्याने गटारे व नदी-नाल्यासारख्या नैसर्गिक प्रवाहात अडथळे निर्माण करतात, तसेच गाय अथवा तत्सम प्राण्यांनी नायलॉन
मांजाचे तुकडे समाविष्ट असलेले खाद्य सेवन केल्यामुळे त्यांना गुदमरण्याचा त्रास होतो. अशाप्रकारे सदर धाग्यामधील मांज्यामधील प्लास्टिकच्या वस्तुमुळे विविध प्रकारचे दुष्परिणाम होतात.
पर्यावरण (संरक्षण) अधिनियम, १९८६ चे कलम ५ अन्वये घाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारी तसेच साठवणूकदार यांच्याकडून तत्परतेने नायलॉन मांजाची विक्री, साठवणूक थांबवावी. ज्यायोगे संपूर्ण वर्षभरात त्यांची साठवणूक हाताळणी व विक्री करता येत नाही. नायलॉन विक्रेते यांचेवर कारवाई करतांना छूप्या मार्गाने वैयक्तिक पतंगबाजी करण्यासाठी नायलॉन धागा बाळगणारे, तसेच इमारतीच्या टेरेसवर पतंगबाजीत नायलॉन धागा सर्रासपणे वापरतांना आढळून
येणाऱ्या इमारतींच्या जागा मालकांवर न्यायालय आणि प्रशासनाने बंदी घातलेल्या नायलॉन धागा वापरण्यास इतरांना प्रोत्साहन दिले म्हणून कारवाई होवू शकते.
नायलॉन बंदीची जनजागृती करतांना शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना नायलॉन बंदी बाबत सार्वजनिक शपथ देण्यात यावी. अनेक वर्षांपासून पतंग उत्सवाचे आनंदी स्वरूप कायम रहावे. या करिता सर्व नागरिकांनी जागरूक
राहून मकरसंक्रांतीचा पारंपरिक पतंग उत्सवाचा आनंद टिकवावा. नायलॉन धागा (मांजा) उत्पादक कारखाने व विक्रेते यांचेवर बंदी आणून त्याचा उपयोग योग्य कारणासाठीच होणे कामी विशिष्ट नियमावली आखून त्याचे प्रशासनामार्फत
काटेकोर पालन व्हावे. अशा सूचना ही काळे यांनी लेखी पत्राद्वारे दिल्या आहेत.