कोपरगाव प्रतिनिधी, दि. ३ : कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांच्या आई सुगंधाबाई त्र्यंबक चांदगुडे यांचे आजारपणामुळे गुरुवारी निधन झाले. त्यांचे वय ८३ वर्ष होते.त्यांनी मरणोत्तर देहदान केले. त्यांचा देह नाशिक येथे डाॅ. वसंतराव पवार मेडिकल काॅलेजला सुपूर्त करण्यात आला. त्यांचे कोणतेही कर्मकांड करणार नसल्याची माहिती चांदगुडे कुटुंबानी दिली.
विधवा प्रथा निर्मूलनाचे शासनाने परीपत्रक काढल्यानंतर महाराष्ट्रात प्रथमच सुगंधाबाई यांनी त्याची अंमलबजावणी केली होती. विधवा असुनही त्यांनी टिकली, मंगळसूत्र, जोडवे परिधान केले होते. चांदगुडे कुटुंबीयांनी याआधीही अनेक पुरोगामी निर्णय घेऊन समाजाला आदर्श घालुन दिला आहे.
सुगंधाबाई यांची आदरांजली सभा दि. १२ फेब्रुवारी रोजी चासनळी, ता. कोपरगाव येथे होणार आहे. यावेळी ‘देहदान व अवयवदान, काळाची गरज’ या विषयावर अवयवदान चळवळीचे कार्यकर्त सुनील देशपांडे (उपाध्यक्ष, फेडरेशन ऑफ ऑर्गन अॅन्ड बाॅडी डोनेशन, मुंबई) यांचे व्याख्यान होणार आहे. या प्रसंगी मरणोत्तर देहदानाची इच्छा असणाऱ्या व्यक्तींचे फाॅर्म भरून घेणार असल्याचे कृष्णा चांदगुडे यांनी सांगितले.