प्रजाहितदक्ष, कल्याणकारी राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज – आ.आशुतोष काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १९ : शुर, बुद्धिमान, मुत्सद्दी, लोककल्याणकारी राजे अशी जगभर ख्याती असलेले हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे आराध्य दैवत नाहीत, तर ते संपूर्ण देशाला, जगाला आदर्शव्रत आणि प्रेरणास्थानी असून ते संपूर्ण जगाचे मार्गदर्शक आहेत. छत्रपती शिवरायांना मॅनेजमेंट गुरू म्हणून जगात गौरवले जाते. पाश्चिमात्य देश त्यांच्या कार्यपद्धतीचा अभ्यास करत आहेत ही गोष्ट संपूर्ण देशवासीयांसाठी अभिमानासपद असून श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रजाहितदक्ष, कल्याणकारी राजे होते असे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी केले.

अखंड हिंदुस्थानाच्या जनतेचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कोपरगाव शहरात आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भव्य मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. जय भवानी-जय शिवाजीच्या जय जयकाराने राजमाता जिजाऊ उद्यानापासून सुरू झालेल्या या रॅलीमध्ये असंख्य शिवभक्त पुरुष व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

यावेळी आ.आशुतोष काळे यांनी देखील या अभूतपूर्व रॅलीत सहभागी होवून शिवभक्तांचा उत्साह वाढविला. या रॅलीचा समारोप श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाजवळ झाला.यावेळी आ.आशुतोष काळे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.याप्रसंगी ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की,छत्रपती शिवाजी महाराजांचे मोठेपण त्यांच्या समतावादी धोरणात होते. शेतकरी, गोरगरीब जनता यांच्या बाबतीत ते अत्यंत दयाळू होते. त्यांनी नेहमीच सर्व धर्मांना समान वागणूक देवून धर्मग्रंथ, धार्मिक स्थळे, महिलांचा सन्मान केला. पराकोटीची नैतिकता असलेले छत्रपती शिवाजी महाराज शेकडो वर्षानंतर आजही प्रत्येक देशवासीयांच्या मनामनात असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी संगितले. यावेळी तहसीलदार विजय बोरुडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.