शासकीय जागेवरील रहीवाशांना उतारे मिळण्याचा मार्ग मोकळा – आमदार काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि, २१ : कोपरगाव शहरात शासकीय जागेवर वास्तव्यास असणाऱ्या लक्ष्मीनगर परिसरातील नागरिकांना नगररचना विभागाच्या नियोजित आराखड्यानुसार जागेचे उतारे देण्याची प्रक्रिया सुरु होणार होती. मात्र त्यामध्ये काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे त्यामध्ये सूट मिळावी यासाठी करीत असलेल्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून शासकीय जागेवर वास्तव्यास असणाऱ्या लक्ष्मीनगरच्या रहीवाशांना त्यांच्या जागेचे उतारे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.

कोपरगाव शहरात लक्ष्मीनगर परिसरात मागील अनेक वर्षापासून शासकीय जागेवर अनेक कुटुंब वास्तव्यास आहेत. ज्या शासकीय जागेवर हे कुटुंब राहत आहेत त्यांना त्यांच्या जागा शासन नियमानुसार नियमाकुल करून त्यांना त्यांच्या नावचे उतारे मिळावे हा प्रश्न मागील अनेक वर्षापासून प्रलंबित होता. त्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी कमिटीची बैठक घेऊन लक्ष्मीनगर मधील शासकीय जागेवर राहणाऱ्या नागरीकांना त्यांच्या जागा शासकीय नियमाप्रमाणे नियमित करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करून हे प्रस्ताव तातडीने शासनाकडे दाखल करण्यात आले होते. त्याबाबत वेळोवेळी पाठपुरावा सुरूच होता.

त्या पाठपुराव्याची दखल घेवून अखेर पुणे नगररचना संचालक, अविनाश पाटील यांनी लक्ष्मीनगरच्या नागरिकांना त्यांच्या जागेचे उतारे देण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी सूट देण्यास सहमती दिली आहे. त्यामुळे शासकीय जागेवर वास्तव्यास असणाऱ्या रहिवाशांची मोठी अडचण दूर होवून त्यांना त्यांच्या जागेचे उतारे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.

मागील अनेक वर्षापासूनचा प्रलंबित असलेला हा प्रश्न सोडविण्यासाठी माजी आमदार अशोकराव काळे यांनी देखील त्यांच्या कार्यकाळात पाठपुरावा केला होता. हा प्रश्न आ.आशुतोष काळे यांनी हाती घेवून सोडविल्यामुळे शासकीय जागेवर वास्तव्यास असणाऱ्या लक्ष्मीनगर परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून त्यांनी आ. आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.