शेवगाव प्रतिनिधी, दि. २२ : शेवगाव तालुक्यात औद्योगिक वसाहतीसाठी (MIDC) जागा आरक्षित करण्याची मागणी करणारे निवेदन जनशक्ती विकास आघाडीच्या वतीने जिल्हा नियोजन समिती प्रारूप विकास योजना यांच्याकडे माजी जिप सदस्या.हर्षदा काकडे यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्ते, शेतक-यांच्या वतीने देण्यात आले.
निवेदनात म्हंटले आहे की, शेवगाव नगरपरिषदेने त्यांच्या हद्दीत महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधीनियम १९६६ चे कलम २६ अन्वये प्रारूप विकास आरखडा योजना जाहीर केला आहे. मात्र या आराखड्यात एमआयडीसी साठी कुठल्याही प्रकारचे आरक्षण ठेवण्यात आलेले नाही.
शेवगाव शहर व तालुक्यातील औद्योगिक वसाहतीचा प्रश्न जिल्ह्याच्या दक्षिण भागात दुर्लक्षित ठरला आहे. मात्र तालुक्यात वीज, पाणी, रस्ते, उद्योग आदी सर्व प्रकारच्या सोयी सुविधांसाठी हा परिसर अतिशय सर्वोत्तम प्रकारचा ठरणार आहे.
शहरातील पैठण, आखेगाव हमरस्त्याचा विचार केला तर असे लक्षात येईल की, शेवगाव शहरात व्यापारी क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे. शेवगाव शहरापासूनच ८ ते १० कि.मी. अंतरावर जायकवाडी धरणाचे बॅकवॉटर आहे. यामुळे औद्योगिक क्षेत्रास लागणारा मुबलक पाणीपुरवठा येथे अवघ्या काही अंतरावर उपलब्ध होणार आहे.
तालुक्यात एम.आय.डी.सी. व्हावी ही येथील व्यापारी, उद्योजक व तरुणांची तसेच या परिसरातील नागरिकांचे मत आहे. येथील व्यापाऱ्यांनी या ठिकाणी आपल्या खाजगी कापूस मिल उभ्या केल्या आहे. यासर्व बाबींचा विचार करून येथे औद्योगिक वसाहत उभी केल्यास तालुक्याच्या विकासाला मोठी मदत होणार आहे.
माजी जिप सदस्या हर्षदा काकडे, यांच्यासह वैभव पुरनाळे, अरुण काळे, जगन्नाथ गावडे, पृथ्वीसिंह काकडे, अमर पूरनाळे, विनोद मोहिते, सचिन आधाट, मनोज पूरनाळे, सुरज कुसळकर, श्रीम.मंगलताई शिंदे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.