मतभेद विसरून लोकशाही टिकविण्यासाठी कार्य करावे – माजी मंत्री हंडोरे

शेवगाव प्रतिनिधी, दि. २६ : आपापसातील गटतट व मतभेद विसरून कार्यकर्त्यांनी एकजुटीने लोकशाही टिकविण्यासाठी कार्य करावे असे आवाहान भीमशक्ती संघटनेचे संस्थापक तथा माजी सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी केले.

      येथील अजिंक्य लॉन्स येथे पार पडलेल्या ‘कार्यकर्ता जागृती ‘  मेळाव्यात ते बोलत होते.   हंडोरे म्हणाले, चळवळीतील कार्यकर्ता तयार होण्याला मोठा कालावधी लागतो. कार्यकर्त्यांना आलेली मरगळ झटकून टाकून परिसरातील गोरगरिबांच्या समस्या व प्रश्नांच्या पाठपुराव्यासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रसंगी जनआंदोलनाची भूमिका घेवून कार्यकर्त्यांनी समाजाच्या प्रती जागरूक रहावे.

      यावेळी माजी जिप सदस्य, पँन्थर नेते पवनकुमार साळवे, यांचा कालकथित सामाजिक कार्यकर्ते आनंद बाबा मगर सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार देवून प्रमुख अतिथींच्या हस्ते सन्मान करण्यात आला. धम्मपाल कांडेकर, भाऊसाहेब साठे, देवराम सरोदे, ओंकार दिनकर, संदीप मगर, शोभा पाताळे, प्रमोद मिसाळ, अनिल गायकवाड, अश्रुबा गायकवाड, बन्सी घंगाळे, बाप्पू मगरे, अरुण साबळे, प्रल्हाद शिंदे, कुणाल इंगळे, भगवान मिसाळ, संतोष बानाइत, अनिल समुद्र आदींसह कार्यकर्त्यांची  उपस्थिती होती.

मजलेशहर येथील महिला मंडळाने सादर केलेल्या भीमगीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष समीर काझी, सुधीर बाबर, प्रकाश तिजोरे आदींच्या हस्ते माजी मंत्री हंडोरे यांचा सन्मान करण्यात आला. माजी जि प सदस्य तथा भीमशक्तीचे प्रदेश सरचिटणीस प्रा. चंद्रकांत कर्डक यांनी स्वागत करून प्रास्ताविक केले. के. बी. शेख यानी सूत्रसंचालन केले. सुखदेव गायकवाड यांनी आभार मानले.