कोपरगाव प्रतिनिधी, स्व. शंकरराव कोल्हे हे सहकारातील एक अभ्यासू नेतृत्व होते. त्यांची कार्ये व कारकिर्द सर्वांनाच माहित आहे. त्यांनी सहकाराच्या माध्यमातून अनेक संस्था उभारून कोपरगांव तालुक्यातील व इतरही भागांचा विकास केला आहे.
स्व. शंकरराव कोल्हे व माझा परिचय महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेमुळे झाला. मी राज्य सहकारी बँकेत साखर कारखाने विभाग प्रमुख म्हणून काम करत होतो. कोल्हे यांच्या संजिवनी कारखान्यास महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचा भांडवली व खेळते भांडवली कर्ज पुरवठा होता. त्यामुळे माझा त्यांच्याशी संपर्क आला. साखर कारखानदारी, ऊस उत्पादक शेतकरी या विषयावर त्यांचे खूप ज्ञान होते व त्या संदर्भात त्यांची भेट झाल्यानंतर ते नेहमी चर्चा करीत असत. कधी कधी आमचे मध्ये काही विषयावर मतभेद सुध्दा होत असत. परंतु चर्चेअंती सर्व काही ते समजून सांगत. त्यामुळे स्व. भाऊसाहेब थोरात व मा.स्व. शंकरराव कोल्हे यांचेकडून साखर उद्योगाबाबत मला खुप शिकायला मिळाले.
स्व. शंकरराव कोल्हे हे मुळातच शेतकरी कुटुंबातील. कृषी पदवी घेतली, परदेशात गेले, परंतु ते तेथे रमले नाही ते पुन्हा मायदेशी आले. शेती करु लागले. त्यातूनच त्यावेळी सहकार चळवळ मोठया प्रमाणात पसरत होती आणि त्यांनी मग संजिवनी सहकारी साखर कारखाना काढला. त्यानी अनेक सहकारी संस्था निर्माण केल्या. शैक्षणिक, दुग्ध, बँक अशा संस्था स्थापन केल्या त्या आजही खूप उत्तमरित्या चालू आहे.
शेतक-यांबद्दल त्यांना खूप आस्था होती. त्यास अनुसरून मी माझा एक अनुभव सांगतो. कारखान्याचा गाळप हंगाम संपला होता. शेतक-यांना ऊसाचे पेमेंट करावयाचे होते. परंतु साखर मालतारण खाती पुरेशी उपलब्धता नव्हती. मग त्यांनी मालतारण खाती उचल प्रस्ताव तयार केला. राज्य बँकेच्या नाशिक प्रादेशिक कार्यालयाचा अहवाल घेतला व मला फोन केला कि, मी उद्या मुंबईला येत आहे, आमचा उचल प्रस्ताव छाननी करुन त्वरित द्यावा. आणि ते पहाटे ५.०० वाजाता माझ्या ठाणे येथील निवासस्थानी कारखान्याचे कार्यकारी संचालक नायडू, चिफ अकौंटंट श्री. लांडे व स्वतः आले आणि सदर प्रस्ताव तुम्ही छाननी करुन सकाळी ९ वाजेपर्यंत एमएससी बँकेच्या कुलाबा येथील अतिथीगृहात बँकेचे चेअरमन स्व. विष्णू आण्णा पाटील यांचेकडे यावे अशी विनंती केली.
मी माझे जिल्हयातील कारखाना असल्याने लगेच घरीच त्याची छाननी केली व सकाळी ९ वा. बँकेचे एम.डी. व चेअरमन विष्णू आण्णा पाटील यांचेकडे गेलो. तेथे शंकरराव कोल्हे व चेअरमन यांची चर्चा झाली व स्व. विष्णू आण्णा पाटील यांनी सांगितले की, शेतक-यांना पेमेंट करावयाचे असल्याने आजच्या संचालक मंडळ सभेस टिपणी करावी. त्यानुसार कार्यवाही केली व त्याच दिवशी त्यांना मंजूरी दिली. व त्यांनी शेतक-यांचे पेमेंट वेळेवर केले. व नंतर बँकेचे सर्व कर्ज वेळेत वसुल झाले असे हे व्यक्तीमत्व नेहमी शेतक-यांच्या हिताची काळजी करत असत.
स्व. शंकरराव कोल्हे यांनी नंतर अनेक राज्य व केंद्र स्तरावरील संस्थावर प्रतिनिधी व संचालक होते. ते सहकारमंत्रीही होते. त्यांनी अनेक राज्य/केंद्र सरकारचे परिसंवादामध्ये भाग घेऊन आपली परखड मते मांडली. आंदोलनेही केली. त्यांच्या अनुभवाचा जिल्हयातील सहकारी संस्थांना खूप फायदा झाला.
मी राज्य बँकेत असतांना त्यांचा अनुभवाचा मला नेहमीच उपयोग होत असे. त्यांची पुस्तकेही मी वाचली आहेत. मी राज्य बँकेतून अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रुजू झाल्यानंतर त्यांची जिल्हा बँकेतील संचालक काळातील कामेही पहावयास मिळाली. साखर कारखाने हंगाम सुरु होण्यापुर्वी ते जिल्हयातील सर्व साखर कारखान्याचे मिटींग जिल्हा बँकेत घेत असत व येत्या हंगामात ऊसदर व एच अँड टी वाटप सर्वांनी सारखे करावे असा त्यांचा नेहमी आग्रह असे. त्यामुळे कारखान्यास स्पर्धा न करता त्यांच्यात सलोखा राहत असे. असे अनेक महान कार्य त्यांनी केले आहे.
त्यांचेनंतर श्री. बिपीनदादा जिल्हा बँकेचे संचालक झाले व आता नातू श्री. विवेक कोल्हे बँकेचे संचालक आहे. या सर्व घराण्याचा एकच उद्देश, संस्था मोठया झाल्या पाहिजे. त्यासाठी निर्णय घेण्यास नेहमी आग्रही असतात.
आज संजिवनी उद्योग समूह मोठया प्रमाणात वाढलेला आहे व उत्तम प्रकारे चालू आहे. स्व. शंकरराव कोल्हे यांनी हे सर्व खूप कष्टातून उभे केले ते जपण्याचे व वाढविण्याचे काम बिपीनदादा, स्नेहलताताई, विवेकभैय्या, नितीनदादा हे सर्व करीत आहे.
स्व.शंकरराव कोल्हे यांचा मला जेव्हढा सहवास लाभला त्यामध्ये मला खूप शिकण्यास मिळाले. तसेच त्यांनी माझ्यावर नेहमीच प्रेम केले. आपला माणूस मोठया पदावर आहे याचा त्यांना नेहमी अभिमान वाटत असे., अशा अनेक आठवणी आहेत. त्याच्या जाण्याने सहकाराची खरोखरच मोठी हानी झाली आहे. अशा या महान विकास पुरुषास त्यांचे प्रथम पुण्य स्मरणानिमित्त विनम्र अभिवादन.
रावसाहेब लक्ष्मण वर्पे, मुख्य कार्यकारी अधिकारी, दि अहमदनगर डि.से.को-ऑप बँक लि. अहमदनगर,