अहमदनगर प्रतिनिधी, दि.८ : अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या २१ संचालकांपैकी राष्ट्रवादीचे १०, काँग्रेसचे ४, भाजपचे ६ व एक शिवसेना असे पक्षीय बलाबल असतानाही भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी तब्बल १० संचालकांच्या मतावर अध्यक्ष पद मिळवल्याने जिल्ह्यात कर्डिले यांना पाठिंबा देणारे कोण यावर चर्चा रंगली आहे.
विरोधीपक्षनेते अजित पवार हे आदल्या दिवशी अहमदनगर येथे येवुन राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्रशेखर घुले यांच्या नावावर शिक्कामोर्तब करुन निघून गेले, माञ प्रत्यक्षात पवार यांच्या विचारा विरुध्द घडल्याने राष्ट्रवादीतुन फुटून भाजपला कोणी कोणी पाठिंबा दिला यावर जिल्ह्यात चर्चा रंगली आहे.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीनंतर बँकेचे अध्यक्ष पद राष्ट्रवादी काँग्रेसला व उपाध्यक्ष पद काँग्रेसच्या कोट्यात मिळालेले आहे. त्यानुसार काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचे जवळचे नातलग असलेले व महानगर बँकेचे अध्यक्ष असलेले उदय शेळके यांना अध्यक्षपद देण्यात आले होते. परंतु दुर्दैवाने प्रदीर्घ आजारामुळे त्यांचे अलीकडेच निधन झाले, त्यामुळे नवीन अध्यक्ष निवडीसाठी बँकेच्या सभागृहात आज जिल्हा उपनिबंधक गणेशपुरी यांच्या अध्यक्षतेखाली अध्यक्ष निवडीची सभा बोलाविण्यात आली होती.
या निवडणुकीत भाजपचे शिवाजी कर्डिले यांना १९ पैकी भाजपचे केवळ ६ संचालक असताना १० संचालकांनी मतदान केले तर राष्ट्रवादी व काँग्रेस चे तब्बल १४ संचालक असुनही राष्ट्रवादीचे चंद्रशेखर घुले यांना केवळ ९ संचालकांनी मतदान करीत शिवाजी कर्डिले यांना विजयी करुन जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी विराजमान केले.
अजित पवार यांनी निवडीच्या आदल्या दिवशी सर्व संचालकांशी चर्चा करुन घुले यांच्या नावावर शिक्कामोर्तब करुनही अजित पवार यांच्या शब्दाला डावलून भाजपच्या बाजुने कोण झुकले? हक्काचे १४ संचालक असताना ५ संचालकांनी भाजपच्या बाजुने मतदान करुन जिल्ह्यातील अर्थव्यस्थेचा कणा समजलेल्या महत्वाच्या जिल्हा बँकेवर भाजपच्या शिवाजी कर्डिले यांना बसवल्याने जिल्ह्यात राजकीय चर्चेला उधान आले आहे.
अवघ्या एक मतांनी घुले यांच्या हातून अध्यक्ष पद गेले. सर्व काही जुळवून अजित पवार निघुन गेले, पण नगर जिल्ह्यातील संचालकांनी पवारांच्या पाश्चात्य वेगळाच निर्णय घेतल्याने जिल्ह्याच्या राजकारणात अर्थात जिल्हा सहकारी बँकेच्या राजकारणात अजित पवारांचीही पावर कमी पडल्याची चर्चा जोरदार सुरु आहे.