महिलांनी आवडीच्या क्षेत्रात काम करून प्रगती साधावी – श्रीमती वैद्य

शेवगावात महिला आनंद मेळाव्यास उत्तम प्रतिसाद

शेवगाव प्रतिनिधी, दि. ८ : महिलांनी आपल्या कोणत्याही आवडीच्या क्षेत्रात जिद्दीने काम करून स्वतःच्या कुटुंबा बरोबरच समाजाच्या प्रगतीस हातभार लागेल असे काम करावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्त्या, भगवान बाबा मल्टीस्टेटचे प्रवर्तक, ज्येष्ठ उद्योजक मयूर वैद्य यांच्या मातोश्री श्रीमती मंदाकिनी वैद्य यांनी केले आहे.

      शेवगाव येथील नारीशक्ती बचत गट, हिरकणी बचत गट व सावित्री बाई महिला बचत गटाच्या संयुक्त विद्यमाने  जागतिक महिला दिनानिमित्त स्वराज मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या ‘महिला आनंद’ मेळाव्याचा शुभारंभ श्रीमती  वैद्य व भारदे विद्यालयाच्या सेवानिवृत्त शिक्षिका रागिनी भारदे यांच्या हस्ते आज करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या.

      महिला आनंद मेळाव्याच्या संयोजिका सीमा बोरुडे यांनी सर्वांचे स्वागत  करून प्रास्ताविक केले. मागील वर्षी महिला दिनी आयोजित ‘महिला आनंद मेळाव्याला शेवगावकरांनी मोठा प्रतिसाद दिला. म्हणून या वर्षी नव्या उमेदीने हा उपक्रम राबविला आहे.  दोन दिवसाच्या आनंद मेळाव्यासाठी  परिसरातील बचत गटांच्या महिलांना विविध स्टॉल लावण्यासाठी मोफत स्टॉल उपलब्ध करून दिले आहेत. यासाठी भगवानबाबा मल्टी स्टेटचे मोठे योगदान लाभले आहे.

      मंगल कार्यालयाच्या एका दालनात विविध प्रकारच्या ज्वेलरीचे अनेक स्टॉल, साड्या पैठण्यांचे स्टॉल, लहान मुलांच्या  फॅन्सी कपड्याचे, विविध प्रकारच्या मसाल्याचे, लोणच्याचे, कुरडई पापड सांडग्याचे अनेक एका पेक्षा एक सरस स्टॉल सजले असून दुसऱ्या दालनात पाणीपुरीचे, वडा सांबर, कांदा पोहे, गरम गरम कांदा बटाटे भज्याचे स्टॉल खुणावतात. 

थोडे पुढे गेल्यावर गावोगावच्या व भीमथडीच्या कृषी मेळाव्यात विशेष नावाजलेल्या ज्येष्ठ कार्यकर्त्या कमलताई पुंड यांच्या बचत गटाच्या चुलीवरच्या भाकरी आणि झणझणीत आमटीचा सुवास इतका दरवळतो की, त्याचा आस्वाद  घेण्यासाठी आलेल्यांची पाऊले आपोआप वळल्याशिवाय राहत नाहीत. शहरातील महिलावर्ग या आनंद मेळाव्यास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत असून खरेदी करत खाद्य पदार्थांचा मनमुराद आस्वाद घेत आहेत.