शेवगाव प्रतिनिधी, दि. १८ : राज्यांतील दोन वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकासह लोकसभा आणि विधानसभाही कधीही जाहीर होऊ शकतात . त्यामुळे या पुढचा काळ हा निवडणूकांचा आहे. त्यामुळे गेले चार वर्षे बिळात जाऊन बसलेले कारखानदार आता बिळातून बाहेर येतांना दिसत आहेत.
शेवगाव पाथर्डी तालुक्यातील प्रस्थापित कारखानदार आता निवडणुकांची चाहूल लागताच बिळातून बाहेर येऊन “सोंगाडया”सारखी वेगवेगळे सोंग करत आहेत. पण त्यांच्या सोंगांना शेवगाव पाथर्डीतील जनता आता भीक घालणार नाही तर त्यांना त्यांची जागा दाखवतील व पुन्हा बिळात पाठवतील असा विश्वास वंचित बहुजन आगडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण यांनी व्यक्त केला.
वंचित बहुजन आघाडीचे तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी तसेच गांव प्रमुख आणि बुथ प्रमुख यांच्या आयोजित बैठकीत प्रा. चव्हाण बोलत होते. यावेळी चव्हाण यांनी प्रस्थापित कारखानदारावर सडकून टीका करत आगामी काळातील सर्व निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी सज्ज व्हा असे आवाहन केले.
यावेळी मराठा समाजाचे ज्येष्ठ व्यावसायिक अरूण झांबरे पाटील व एरंडगावचे कल्याणराव भागवत पाटील यांनी वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहीर प्रवेश केला. मतदार संघातील वंचित युवा आघाडी व महीला पदाधिकारींची निवड करण्यात आली. बैठकीस तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी व महिला भगीणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. प्रा. विजय हुसळे, संजय चव्हाण, शेख बन्नूभाई, कल्याणराव भागवत ‘ अरूण झाबंरे, यांची भाषणे झाली. वंचितचे तालुका अध्यक्ष शेख प्यारेलाल यांनी प्रास्ताविक केले. महीला तालुका अध्यक्ष संगीता ढवळे यांनी आभार मानले.