कोपरगाव प्रतिनिधी, दि. २७ : कोपरगाव शहर विकासासाठी जिल्हा नियोजन अंतर्गत घेतलेल्या विकास कामांमध्ये वैशाली स्कुटर ते अमरधाम या रस्त्याच्या कामास तांत्रिक मान्यता मिळून या कामाचे नियोजन विभागाकडे प्रस्ताव देखील तयार आहे. परंतु कोपरगाव तालुक्याच्या माजी लोकप्रतिनिधिंनी सदरचा रस्ता होऊ नये व स्पर्धात्मक निविदा न निघता स्वतःच्या मर्जीतील ठेकेदारांना दहा-दहा लाखांचे पंधरा कामे मिळावी यासाठीचे पत्र नगरपालिकेला दिले.
यामुळेच कोपरगाव शहरातील विकासात अतिशय महत्त्वाच्या असलेल्या विकास कामांना कुठेतरी खिळ बसू शकणार आहे. तेव्हा याचे संशोधन करून विकासाचे वावडे कोणाला आहे याचे पाकीटवाल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आत्मपरीक्षण करून विकासावर बोलावे असा टोला राष्ट्रवादीचे मनोज नरोडे यांनी भाजपचे पदाधिकाऱ्यांना लगावला आहे.
नरोडे यांनी पुढे असे म्हटले आहे की, आजपर्यंत कोल्हेंनी नेहमीच कोपरगाव शहराच्या नागरिकांची वेळोवेळी अशीच दिशाभूल केली असून २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत कोपरगाव शहरातील मतदारांनी आ. आशुतोष काळे यांना दिलेले मताधिक्य अजूनही माजी आमदार स्नेहलता कोल्हे विसरलेल्या नसून ते त्यांच्या चांगलेच जिव्हारी लागलेले आहे.
त्यामुळे शहर विकासाच्या बाबतीत नागरिकांना वेठीस धरून विकास कामे कशी थांबविली जातील याचा प्रयत्न माजी आमदार कोल्हे यांच्याकडून सातत्याने केला जात आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा विकासाचा प्रश्न उपस्थित होतो तेव्हा व्यक्तिगत पातळीवर टिका करून विकासाचा प्रश्न भरकटविण्याचा प्रयत्न आजपर्यंत कोपरगाव भाजपा कडून करण्यात आलेला आहे.
न्यायालयात जावून कोपरगाव शहरातील २८ विकासकामांना मिळविलेली स्थगिती चुकीची असल्याचे जनतेच्या रेट्यामुळे लक्षात आल्यानंतर ती स्थगिती त्यांना उठवावी लागली याचे भान ठेवून पाकीट घेणाऱ्यांनी फक्त पाकिटा पुरतेच बोलावे. उगाच व्यक्तिगत पातळीवर टीका करू नये व्यक्तिगत टीका करणे आम्हालाही जमते मात्र आमच्या नेत्याची आम्हाला तशी शिकवण नाही.त्यामुळे यापुढे विकासावर बोलण्याचे सुचत नसेल तर बोलू नका मात्र वैयक्तिक टीका करू नका व आम्हाला देखील आमच्या मर्यादा ओलांडण्यास भाग पाडू नका.
आम्हाला देखील तुम्हाला समजेल अशा भाषेत समजावून सांगता येते त्यामुळे आमच्या नादी लागू नका असा ईशारा मनोज नरोडे यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना दिला आहे. तसेच कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी माजी आमदार कोल्हे यांच्या दबावाला बळी पडून नियोजित विकास कामांमध्ये बदल करू नये अन्यथा आंदोलन केले जाईल असे मनोज नरोडे यांनी शेवटी म्हटले आहे.
ज्यांच्या कडून आपण पाकीट घेऊन वेळोवेळी बातम्या देतात त्या पराग संधान यांचा नगरपालिका निवडणुकीत पाकीटे वाटुनही ११ ते १२००० मतांनी दारुण पराभव झाला होता त्यामुळे तुम्ही जनाधारावर तर बोलूच नका – मनोज नरोडे
माझ्या निष्ठेबाबत शंका उपस्थित करणाऱ्यांच्या नेत्यांनी निष्ठा राखली का? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांनी विविध जबाबदाऱ्या दिल्या मंत्रिपद दिले. त्यांना देखील यांनी सोडले पण मी अजूनही आहे त्याच पक्षात असून यापुढेही मा.शरद पवार साहेब व राष्ट्रवादी काँग्रेस सोबत राहणार आहे. तेव्हा माझ्यावर टिका करणारे हे निष्ठावान व खानदानी असले पाहिजेत – संदिप वर्पे (जिल्हा कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस)