कोपरगाव प्मेरतिनिधी, दि. २७ : मेलेल्या माणसाच्या टाळूवरचे लोणी खाण्यासारखे अंत्यविधीसाठी लागणारे रॉकेल काळ्या बाजाराने विकणारे, गोर गरिबांचे हक्काचे रेशनचा काळा बाजार करून आयुष्य जगणारे पाकिटासाठी दलबदलु आणि सावकारीचा धंदा करून गरिबांची पिळवणूक करणाऱ्या व जुगार आणि वाळू धंद्यात भागीदारी असणाऱ्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांवर बोलू नये असा सल्ला नरोडे यांनी दिला आहे.
‘काळे गटात स्वतःचा एकही निष्ठावंत उरला नाही की, काय म्हणून जे ज्यांचे दात कोरले त्यांतही कोल्हेंचे उपकार दिसतील. अशा कोल्हे गटातून पाकिटासाठी फुटून गेलेले फुटीर आहेत. त्यांचा खांदा वापरून कोल्हेंवर टीका करावी लागणे ही काळेंची नामुष्की आहे. त्यामुळे काळे गटाने स्वतःचे निष्ठावंत खांदे तयार करावे अशी सणसणीत चपराक नरोडे यांनी लगावली आहे.
गेले तीन वर्षांपासून विद्यमान आमदार आणि त्यांचे चेलेचपेटे यांनी शहर विकासाबद्दल कायमच जनतेची सतत दिशाभूल केली आहे. तीन वर्षांत डोळ्यांनी दिसेल असे एकही भरीव काम विद्यमान आमदारांना करता आलेले नाही. जी कामे झाली ती माजी आमदार सौ.स्नेहलता कोल्हे यांच्या कार्यकाळात झालेली आहेत. त्याचे लोकार्पण करण्याचे दुर्दैव काळेंवर आले आहे.
काही ठोस मुद्दे नसले की कायमच कोल्हे विरोध करत आहे असे भासवून स्वतःची निष्क्रियता झाकण्याचे बारसे काळेंना कार्यकर्त्यांच्या समाधानासाठी करावे लागते आहे. शहर विकासाला कोल्हे विरोध करतात असे खोटे आरोप करून प्रत्यक्षात विकासाचा मागमूस नसलेल्या काळेंच्या कार्यकर्त्यांची परिस्थिती ही आपलाच बँड आणि आपणच नाचायच अशी झाली आहे.
जेसीबीने गुलाल उधळून विकासाच्या वल्गना करणाऱ्या आमदार काळे यांचे एक ना धड भारभर चिंध्या असे कोलांटउड्या खाणारे कार्यकर्ते अर्धवटराव आहेत हे जनता जाणून आहे. पराभव आणि विजय हे निवडणूकीत कायमच येतात जातात. स्वातंत्र्य काळापासून ४० वर्षाहून अधिक काळ जनतेने कोल्हे कुटूंबावर विश्वास दाखवला आहे व काळे यांना तालुक्याने सर्वाधिक काळ नाकारले आहे हे वास्तव मान्य करावे.
कोपरगाव शहराच्या विकासाबद्दल कायमच कोल्हे कुटूंबावर आरोप करून स्वतःची जबाबदारी झटकण्याचा केविलवाणा प्रयोग आमदार व त्यांचे पाकीट बहाद्दर चेले करतात. जास्त बोललो तर जास्त मोठे पाकीट मिळेल, या लालसेपोटी काळे गटात मी बोलू का, तू बोलू अशी पाकीट स्पर्धा रंगली आहे.
गत नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत स्वतः पाकिटासाठी आग्रही असणाऱ्यांनी पाकिटावर बोलावे हे म्हणजे चोर तर चोर वर शिरजोर अशी अवस्था आहे. आपली पातळी किती व आपण बोलतोय किती ? आणि त्या बदल्यात पदरात पडणारे पाकीट किती याचा ताळमेळ लावूनच पाकीटसम्राटांनी बोलावे असा खोचक सल्ला नरोडे यांनी दिला आहे.
आमची निष्ठा कोल्हे कुटूंबावर आहे कारण त्यांचे योगदान कोपरगाव मतदारसंघासाठी आहे, ज्यांची निष्ठा पावला पावलावर विकली जाते त्यांनी अधिकचे बोलू नये नाहीतर त्यांचे पाकीट कुठून कुठे जातात आम्हाला जनतेसमोर मांडावे लागेल – प्रसाद (आबा)नरोडे