कोपरगाव प्रतिनिधी, दि. ५ : २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मतदार संघातील जनतेने विश्वासाने माझ्यावर टाकलेली जबाबदारी प्रामणिकपणे पार पाडण्यासाठी जीवाचे रान करून महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून १५०० कोटी व सरकार बदलल्यानंतर देखील एकाच वर्षात ५५० कोटी निधी असा एकूण २००० कोटी निधी मतदार संघातील जनतेच्या आशिर्वादाने मिळविला असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी सांगितले.
कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाच्या वतीने सोमवार रोजी कोपरगाव तहसील कार्यालयाच्या मैदानावर महाराष्ट्राचा हास्यकल्लोळ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी उपस्थित मतदार संघातील जनसमुदायाशी संवाद साधतांना ते बोलत होते.
यावेळी पुढे बोलतांना आ. आशुतोष काळे म्हणाले की, कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांनी सहकार, शिक्षण, समाजकारण करतांना मतदार संघातील माणसाला माणूस जोडून एक कुटुंब निर्माण केल. या कुटुंबातील सर्वांनी कर्मवीर शंकररावजी काळे साहेव व माजी आमदार अशोकदादा काळे यांच्याप्रमाणे माझ्यावर विश्वास दाखवून मला सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल मी स्वत:ला भाग्यवान समजतो. मतदार संघाच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्याचे मोठे आव्हान होते मात्र मतदार संघातील जनता माझ्यासोबत असल्यामुळे २००० कोटी निधी मिळविला आहे.
मागील साडे तीन वर्षात कोपरगाव शहराचा प्रलंबित असलेला पाणी प्रश्न सोडविण्यासाठी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या सहकार्याने हा प्रश्न मार्गी लावतांना ५ नंबर साठवण तलाव व वितरण व्यवस्थेसाठी १३१.२४ कोटी निधी दिला आहे. हे काम सध्या प्रगतीपथावर असून येत्या काही महिन्यात हे काम पूर्ण होवून कोपरगावकरांना नियमित स्वच्छ व शुद्ध पाणी मिळणार आहे. शंभरी पार केलेल्या गोदावरी कालव्यांच्या दुरुस्तीचा प्रश्न देखील ३०० कोटी निधी मिळवून मार्गी लागला आहे. मतदार संघातील बहुसंख्य रस्त्यांची कामे पूर्ण झाली असून अनेक रस्त्यांची कामे प्रगतीपथावर आहेत.
सावळीविहीर-कोपरगाव रस्ता राष्ट्रीय महामार्गाकडे हस्तांतरित करण्यासाठी असलेल्या अडचणी दूर करून या ११ किलोमीटर रस्त्यासाठी तब्बल १९१ कोटी केंद्रीय रस्ते विकास मंत्री ना. नितीनजी गडकरी यांच्याकडून मिळविला आहे व या रस्त्याचे काम देखील प्रगतीपथावर आहे.रा.मा. ६५ झगडे फाटा ते वडगाव पान रस्ता (तालुका हद्द) व राज्य मार्ग ७ देर्डे फाटा ते सात मोऱ्या या रस्त्यांचे देखील काम लवकरच सुरु होणार आहे. त्याचबरोबर मतदार संघातील अनेक पुलांना निधी देवून या पुलांचा प्रश्न मार्गी लावला आहे. ग्रामीण भागातील पाणी पुरवठा योजनांसाठी २७० कोटीचा निधी देवून महिलांच्या डोक्यावरचा हंडा कायमचा उतरविला आहे. कोपरगाव तालुक्यातील श्री साईबाबा विमानतळाच्या विकासासाठी १५० कोटी व प्रवासी टर्मिनलसाठी ५२७ कोटी असा ६७७ कोटी निधी मिळविला आहे.
आरोग्याच्या बाबतीत कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाला १०० बेडच्या उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळवून संवत्सर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा मिळवून दिला आहे. तसेच माहेगाव देशमुख येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम पूर्ण झाले असून तिळवणी प्राथमिक आरोग्य केंद्रास मान्यता मिळविली आहे.
माजी आ.अशोकराव काळे यांनी त्यांच्या कार्यकाळात कोपरगाव तालुक्यात १३२ के.व्ही. वीज उपकेंद्र उभारण्यासाठी मंजुरी मिळविली होती. परंतु २०१४ ला झालेल्या सत्तांतरानंतर हे वीज उपकेंद्र कोपरगाव तालुक्यातून सिन्नर तालुक्यात गेले. हे वीज उपकेंद्र तातडीने उभारले जावे यासाठी मागील तीन वर्षात पाठपुरावा केला. त्या पाठपुराव्यातून या वीज उपकेंद्राचे काम पूर्ण झाले आहे. सर्व प्रकारचे तांत्रिक प्रात्यक्षिके देखील पूर्ण होऊन या वीज उपकेंद्राचे नुकतेच राज्याचे विरोधी पक्षनेते ना. अजितदादा पवार यांच्या हस्ते उद्घाटन झाले आहे.
या वीज उपकेंद्राला कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव, सुरेगाव, चासनळी आदी वीज उपकेंद्र जोडली जाणार आहेत. त्यामुळे त्याचा फायदा या उपकेंद्रा अंतर्गत असणाऱ्या कोपरगाव तालुक्यातील अनेक गावातील घरगुती व कृषी पंपांना पूर्ण क्षमतेने सुरळीत वीजपुरवठा होण्यास मदत होवून कोपरगाव उपकेंद्राचा भार कमी होणार आहे. त्यामुळे संपूर्ण कोपरगाव तालुक्याचा वीजपुरवठा सुरळीत होणार आहे. मतदार संघातील ब्राह्मणगाव येथे मंजूर करून घेतलेल्या नवीन ३३/११ के. व्ही. वीज उपकेंद्र उभारणीसाठी ४.८५ कोटीच्या कामाचा व वारी वीज उपकेंद्राच्या ६० लाखाच्या क्षमता वाढ कामाचा कार्यारंभ आदेश प्राप्त झाला आहे. त्यामुळे बहुतांश प्रमाणात मतदार संघाच्या विजेच्या समस्या दूर करण्यात आशुतोषदादांना यश आले आहे.
निवडून आल्यानंतर मतदार संघाच्या विकासाचे आवाहन जरूर होते. परंतु पहिल्यांदा विधानसभेत जात असताना मतदार संघाची विकासाच्या बाबतीत झालेली वाताहत पाहून मनाशी निश्चय केला होता. त्यादृष्टीने केलेल्या माझ्या प्रामाणिक प्रयत्नांना महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मतदार संघाचा विकास साधतांना मला मंत्रिमंडळातील सर्वच मंत्री महोदयांचे सहकार्य लाभले असून मतदार संघाच्या रखडलेल्या विकासाला आकार देतांना २००० कोटीपेक्षा जास्त निधी मिळविला आहे. यापुढेही कोपरगावची बाजारपेठ पुन्हा उर्जितावस्थेत आणण्यासाठी जे जे काही प्रयत्न करता येईल ते मी करणार आहे. विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी, मजूर, दिव्यांग, महिला भगिनी यांचे उर्वरित प्रश्न जनतेच्या आशीर्वादाने यापुढील काळात सोडविणार असल्याची ग्वाही आ. आशुतोष काळे यांनी यावेळी दिली.