शेवगाव तालुक्यातील ६ ग्रामपंचायतीच्या १० रिक्त जागांसाठी पोट निवडणुकी जाहीर

शेवगाव प्रतिनिधी, दि. २४ :  तालुक्यातील ६ ग्रामपंचायतीच्या रिक्त असलेल्या एकूण १० जागांसाठी होणाऱ्या पोट निवडणुकीसाठी मंगळवारी ( दि. २५ ) उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होत आहे.

      तालुक्यातील गोळेगाव ग्रामपंचायतीच्या ५ तसेच भागवत एरंडगाव, जुनी खामपिंपरी, दहीगाव शे, अमरापूर व आव्हाणे खुर्द ग्रामपंचायतीच्या प्रत्येकी एका जागेसाठी अशा एकूण ६ ग्रामपंचायतीच्या एकूण १० जागांसाठी पोट निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

दि. २५ एप्रिल ते २ मे या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करणे, दि.३ मे रोजी उमेदवारी अर्जांची छाननी, दि. ८ मे पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्यात येणार असून दि. १८ मे रोजी मतदान व १९ मे रोजी मत मोजणी होवून निकाल जाहीर करण्यात येणार आहे. तालुक्यात सुरु असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या रणधुमाळी बरोबरच तालुक्यातील ६ ग्रामपंचायतीच्या १० जागांसाठी पोट निवडणूक होणार असल्याने वरील ६ गावातील राजकारण ढवळून निघण्यास सुरुवात झाली आहे.

यातील अमरापूर ग्रामपंचायत वगळता अन्य ५ ग्राम पंचायतीची मुदत दोन महिन्याने संपणार आहे. त्यामुळे अवघ्या दोन महिन्यासाठी निवडणुकीचा आर्थिक प्रपंच उभा करण्यास उमेदवार तयार होतील का ? अशी शंका व्यक्त केली जात आहे.