आयईईई कडुन संजीवनी बध्दल गौरवोद्गार
कोपरगांव प्रतिनिधी, दि. २७ : संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजमध्ये मानवतेच्या फायद्यासाठी तांत्रिक नवसंकल्पना आणि उत्कृष्टता वाढविण्यासाठी समर्पित असलेल्या व जगातील सर्वात मोठी व्यावसायिक संघटना अशी ओळख असलेल्या संस्थेच्या इन्स्टिटयूट ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्राॅनिक्स इंजिनिअर्स ( आयईईई ), बाॅम्बे सेक्शन पुरस्कृत महाराष्ट्र राज्यातील सहा विभागांचे ‘टेक्नोवेशन २३’ या तांत्रिक प्रदर्शनाच्या स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्या.
माजी मंत्री व संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक स्व. शंकरराव कोल्हे यांना विध्यार्थ्यांनी नाविण्याचा ध्यास घेवुन मानवतेच्या कल्याणासाठी नवनवीन प्रोजेक्ट करावेत अशी कायम इच्छा असायची. म्हणुन संजीवनीच्या वतीने दरवर्षी प्रोजेक्ट विजेत्यांना रू २५ हजाराची बक्षिसे जाहीर केली आहे. यावेळी विजेत्यांना त्यांच्या स्मृति प्रित्यर्थ रू २५ हजारांची रोख बक्षिसे देण्यात आली, अशी माहिती संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजच्या वतीने प्रसिध्दी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
पत्रकात पुढे म्हटले आहे की सकाळच्या सत्रात आयईईई, बाॅम्बे सेक्शन चेअरमन श्री आनंद घारपुरे यांच्या अध्यक्षतेखाली व आयईईई, बाॅम्बे सेक्शनचे स्टुडन्टस अॅक्टिव्हिटी चेअरमन प्रा. दत्तात्रय सावंत, टाटा इन्स्टिट्यूट्स ऑफ फंडामेंटल रिसर्च संस्थेचे सिनिअर सायंटिस्ट डाॅ. बी. सत्यनारायणा, इंजिनिअरींग काॅलेजचे डायरेक्टर डाॅ. ए. जी. ठाकुर, इलेक्ट्राॅनिक्स विभागाचे प्रमुख डाॅ. बी. एस. आगरकर, इलेक्ट्राॅनिक्स अँड काॅम्प्युटर विभागाचे प्रमुख डाॅ. सेबॅस्टिअन जाॅर्ज, येथिल आयईईईच्या प्रतिनिधी साक्षी नेहे यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात उद्घाटन सोहळा संपन्न झाला. श्री घारपुरे व प्रा सावंत यांनी उत्कृष्ट नियोजनाबध्दल संजीवनी बध्दल गौरवोद्गार काढले.
उद्घाटनानंतर लागलीच येथिल इंजिनिअरींग काॅलेजमध्ये अहमदनगर, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, लातुर आणि नांदेड या जिल्ह्यातील इंजिनिअरींग काॅलेज मधिल विध्यार्थ्यांच्या गटांनी प्रथम फेरीच्या प्रदर्शनात सहभाग नोंदविला. यात ८० प्रोजेक्टसचा समावेश होता यातुन ४ बेस्ट प्रोजेक्टस् निवडण्यात आले. यापुर्वीच जळगांव, पुणे, नागपुर, शेगांव व मुंबई विभागात घेण्यात आलेल्या पहिल्या फेरीच्या प्रदर्शनातून निवड झालेले एकुण २४ प्रोजेक्टस व येथे पहिल्या फेरीत निवड झालेले चार प्रोजेक्टस या सर्वांची दुपारच्या सत्रात अंतिम सादरीकरण झाले.
अंतिम सादरीकरणात थाडोमल शहानी इंजिनिअरींग काॅलेज, बांद्रा, मुंबईने प्रथम विजेते पद मिळविले. गोदावरी काॅलेज ऑफ इंजिनिअरींग, जळगांव व सिंबाॅयसिस इन्स्टिटयूट ऑफ टेक्नाॅलाॅजी, पुणे या संस्थांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळविला. विद्यालंकार इन्स्टिटयूट ऑफ टेक्नाॅलाॅजी, वडाळा, मुंबई या संस्थेला उत्तेजनार्थ बक्षिस मिळाले.
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे यांनी राज्य स्तरीय स्पर्धांचे अतिशय शिस्तबध्द आयोजन केल्याबध्दल संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजच्या सर्व टीमचे अभिनंदन केले. मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी बक्षिस वितरण कार्यक्रमाला हजेरी लावुन सर्व विजेत्या संघांचे व सर्व सहभागी संघांचेही अभिनंदन केले.