शेवगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीत
माजी आमदार घुले बंधूनी आपला गड कायम राखला

शेवगाव प्रतिनिधी, दि. ३० :  शेवगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीत सर्व १८ जागा जिंकत माजी आमदार डॉ.नरेंद्र पाटील घुले, चंद्रशेखर घुले, तसेच माजी सभापती डॉ .क्षितिज घुले यांच्या नेतृत्वाखाली ज्ञानेश्वर शेतकरी विकास मंडळाने भाजप, काँग्रेस, मनसे प्राणीत महायुतीच्या आदिनाथ शेतकरी विकास मंडळाला पराभूत करुन बाजार समितीवर आपले अधिपत्य  कायम राखले. मतदारानी विरोधकांकडे पूर्ण दूर्लक्ष करून  सत्तेच्या चाव्या पुन्हा घुले बंधूकडे दिल्याचेच  मतमोजणीतून स्पष्ट झाले.

  रविवारी (दि.३० ) येथील रेसिडेन्शियल हायस्कूल मध्ये सकाळी ८ ते  सायंकाळी ४ या कालावधीत मतदान प्रक्रिया पार पडली. एकूण २ हजार १८७ पैकी २ हजार १३७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ९७.७१ टक्के मतदान झाले. सायंकाळी ५ वाजता तहसील कार्यालयात मतमोजणी झाली. यावेळी झालेल्या मतमोजणी मध्ये राष्ट्रवादी प्रणित ज्ञानेश्वर शेतकरी विकास मंडळाचे सर्व १८ उमेदवार मोठ्या फरकाने विजयी झाले आहेत. माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्या ज्ञानेश्वर शेतकरी विकास मंडळ विरुद्ध माजी आमदार मोनिका राजळे यांच्या आदिनाथ शेतकरी मंडळ यांच्यात सरळ लढत झाली.

        बाजार समिती १ जून १९५५ साली स्थापना झाली या ६८ वर्षापैकी सुमारे ५०  वर्षापासून घुले घराण्याची बाजार समितीवर अनभिषीक्त सत्ता होती. ती याही वेळेस कायम राहिली आहे. या विजयाने घुले समर्थकांचे मनोबल उंचावले आहे. ही निवडणूक  चंद्रशेखर घुले यांनी गांभीर्याने घेतली. ती जाहीर झाल्यापासून त्यांनी  तालुक्यात झंझावात निर्माण केला होता. आगामी  विधानसभा लक्ष करूनच त्यांनी या निवडणुकीला हाताळल्याचे दिसते.

       कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक जाहीर होताच घुले बंधूंनी कार्यकर्त्यांचे मेळावे  घेत प्रचारात  सातत्यही ठेवले . तर दुसरीकडे विरोधकांना  पॅनल करण्यासाठी  काँग्रेस, मनसेलाही सोबत घ्यावे लागले . तसा विरोधकाचा सर्व डोलारा एकट्या आमदार मोनिकाताई राजळे यांनी  सांभाळला. खासदार डॉ. सुजय विखे यांनी अभावानेच लक्ष  दिल्याची भाजपा कार्यकर्त्यांची भावना आहे.

आव्हाने येथील मेळाव्याला ते आले नाहीत. तसेच आज प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी तरी ते धावती भेट देतील अशी अपेक्षा त्याचे चाहते करत होते. आमदार राजळे यांनी घुले विरोधकांची एकजूट करुन लढा दिला. मात्र तो कमी पडला.

मतदानाची वेळ साय. चार पर्यंत होती. पण हमाल मापाडी मतदार संघातील सर्वच्या सर्व २२१ मतदारांचे मतदान दु ३ च्या आत झाले आणि राष्ट्रवादीचे उमेदवार प्रदीप काळे यांच्या चाहत्यानी फटाक्यांची आतषबाजी सुरु केली.