साखर गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कर्मचाऱ्यानी नवनविन तंत्रज्ञान आत्मसात करावे – राजेंद्र चांदगुडे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ७ : साखर कारखान्याचे गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नवनविन तंत्रज्ञान आत्मसात करून ऑफ सिझन मधील देखभालीची कामे प्राधान्याने पूर्ण करावी असे प्रतिपादन वसंतदादा शुगर इन्स्टीटयूटच्या अभियांत्रिकी विभागाचे मुख्य अभियंता राजेंद्र चांदगुडे यांनी केले.   

           सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याला बदलत्या परिस्थितीत स्पर्धेला सामोरे जातांना सज्ज असले पाहिजे हा ध्यास माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या पश्चात संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी घेतला असून अभ्यासु युवा अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी देश व राज्यपातळीवरील साखर उद्योगातील विविध तंत्रज्ञामार्फत कारखान्याच्या उत्पादन विभागातील कर्मचा-यांना अद्ययावत ज्ञान मिळावे यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टीटयुट पुणे यांच्यावतीने एकदिवसीय प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यांत आले होते त्याप्रसंगी ते बोलत होते. 

           प्रारंभी कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार यांनी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या प्रगतीचा आढावा देवुन प्रशिक्षणाचे महत्व विषद केले. 

       चांदगुडे पुढे म्हणाले की, कारखान्याचे मिल व बॉयलिंग हाउस मध्ये दर्जेदार गुणात्मक गाळपासाठी शेतकी खात्याने पाचटविरहीत उसाचा पुरवठा होईल याबाबतचे नियोजन करावे. त्याचबरोबर कारखान्याची सर्व मशिनरी पुर्ण कार्यक्षमतेने चालण्यासाठी सर्व कर्मचारी व अधिकारी यांनी ऑफ सिझन मध्ये सर्व मशिनरींची देखभाल व दुरूस्ती करणे ही महत्वाची बाब आहे.

जेव्हढ्या तत्परतेने आपण ऑफ सिझन मध्ये चांगली कामे करू, तितक्या जोमाने येणारा हंगाम आपण अव्याहतपणे विना अडथळा पूर्ण क्षमतेने चालवु शकतो. आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून उच्च व दर्जेदार साखर निर्मातीबरोबरच अन्य उपपदार्थ निर्मीतीसाठी काय आवश्यक आहे याबाबत मार्गदर्शन करून शेतकी, लेखा, अभियांत्रीकी, उत्पादन विभागातील सर्व कामकाजाची माहिती संगणकीय प्रणालीद्वारे दिली. 

            याप्रसंगी कारखान्याचे सर्व खाते प्रमुख, विभाग प्रमुख, उपखातेप्रमुख, कर्मचारी मोठया संख्येने हजर होते. सदर प्रशिक्षण शिबीरात कारखान्याचे कामगार व अधिका-यांनी विचारलेल्या प्रत्येक शंकेचे निरसन मुख्य अभियंता राजेंद्र चांदगुडे, सह तंत्रज्ञ सल्लागार प्रमोद देशमुख, शास्त्रीय तंत्रज्ञ राहुल पाटील यांनी केले. राजेंद्र चांदगुडे यांनी साखर कारखानदारीवर यंत्र आणि तंत्र हे दिशादर्शक पुस्तक लिहील्याबददल त्यांचे उपाध्यक्ष रमेश घोडेराव यांनी आभार मानले.