कोपरगाव प्रतिनिधी, दि.२० : कर्म चुकले तर भोग भोगावे लागते. नियतीचा खेळ काहीसा निराळा असतो. कोपरगाव तालुक्याचे तहसीलदार विजय बोरुडे यांनी २० हजारांची लाच घेतल्याच्या आरोपातून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतल्याने तहसीलदार अर्थात तालुका दंडाधिकारी इतरांना दंड देवून पोलीस कोठडीत रवानगी करणारे आज ते स्वतः लाच घेतल्याने त्यांच्या हातात बेड्या अडकल्या.
त्यांना न्यायालयात न्यायाधीशांसमोर हजर केले गेले. शिवाय अलिशान बंगल्यात राहणारे तहसीलदार चक्क पोलीस कोठडीत गेले. त्यांच्या सुखाची झोप आज पोलीस कोठडत झाली. पैशाच्या मोहापायी मोठा माणुस कधी खोटा होईल याचा काहीच भरोसा राहीला नाही हेच या घटनेवरून सिध्द होते.
१९ में २०२३ रोजी शुक्रवारी सायंकाळी कोपरगावचे तहसीलदार आपल्या आनंदाची रजा टाकुण १ जूनच्या बडतीची वाट पहात चांगले स्वप्न रंगवत आराम करीत होते. कुटुंबासोबत आठदिवस विश्रांती घेण्याच्या तयारीत होते. पण सायंकाळी साडे सातच्या दरम्यान अचानक लाचलुचपत प्रतिबंधक नाशिक विभागाच्या पथकाला सुरेगाव येथील एका वाळू तस्करांने तहसीलदार विजय बोरुडे हे आपल्याकडून वाळुचे गाडी नियमित चालु ठेवण्यासाठी मासिक ६५ हजारांची मागणी करीत असुन तडजोडी अंती २० हजारा देण्याचे ठरले असुन ते पैसे तहसीलदार यांच्यावतीने त्यांचा खाजगी पंटर गुरूमित हरनितसिंग दडियाल रा. कोपरगाव यांच्याकडे देण्याचे ठरल्याचे सांगितले.
यावरून लाचलुचपत प्रतिबंधक नाशिक विभागाचे पोलीस अधिकारी शर्मिष्ठा घारगे, अप्पर पोलीस अधीक्षक नारायण न्याहाळले, पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा पथकाचे प्रमुख पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे, पोलीस कर्मचारी पंकज पळशीकर,नितीन कराड, प्रविण महाजन, प्रभाकर गवळी, चालक संतोष गांगुर्डे यांनी योग्य सापळा लावून कोपरगाव तहसील कार्यालय जवळील रसरंग कॅन्टींग येथे तहसीलदार यांच्यावतीने पैसे स्विकारण्यासाठी तयारीत असलेल्या गुरुमित दडियाल याच्याकडे २० हजारांची रोकड रक्कम स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.
त्याच्याकडे कसुन चौकशी केली असता ते पैसे आपण तहसीलदार यांच्या सांगण्यावरून घेतल्याचे सांगितले असल्याने तहसीलदार विजय बोरुडे यांच्या पर्यंत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने झेप घेतली आणि अखेर तहसीलदार बोरुडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
कोपरगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये तहसीलदार विजय बोरुडे व गुरुमित दडियाल यांच्या विरोधात शुक्रवारी राञी उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला असुन त्या दोघांना पोलिसांनी एकाच कोठडीत डांबून ठेवले शनिवारी कोपरगाव न्यायालयासमोर दोघांना उभे केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
दरम्यान तहसीलदार विजय बोरुडे यांची कारकीर्द काही दिवसांपूर्वी चर्चेची व वादग्रस्त ठरली आहे. गेल्या काही दिवसांपुर्वी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना अर्वाच्य भाषेत बोलणे, तेथील परिचारिके बरोबर गैरवर्तन करणे, शहर पोलीस स्टेशनमध्ये जावून धिंगाणा घालणे आदी प्रताप ताजे असताना पुन्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकल्याने तहसीलदार विजय बोरुडे यांचे होणारे प्रमोशन आता डिमोशनवर येवून टेकले आहे. सुखाचा जीव दुःखात घालण्याची वेळ तहसीलदार विजय बोरुडे यांच्यावर हाताने ओढावली आहे…!