शेवगाव प्रतिनिधी, दि. २२ : दहावी बारावीचा काळ विद्यार्थ्यांच्या भावी आयुष्याच्या दृष्टीने कलाटणी देणारा आयुष्याची दिशा ठरविणारा असतो. तेव्हां अशी शिबीरे वरचेवर व्हावीत असे शासनाचे नियोजन आहे. त्यांचा फायदा जास्तीत जास्त विदयार्थ्यांनी घ्यायला हवा असे आवाहन आमदार मोनिकाताई राजळे यांनी केले.
नव्या पिढीला परंपरागत शिक्षणाबरोबर काळाची पावले ओळखून नावीन्य पूर्ण शिक्षण घेणे गरजेचे आहे, देशाचे भवितव्य युवा पिढीच्या हातात आहे. त्यामुळे युवा पिढीला मार्गदर्शन करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात शासनाचे कौशल्य रोजगार उद्योजकता विभाग अंतर्गत छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचे माध्यमातून युवक युवतींना मार्गदर्शन करण्यात येत आहे. शेवगाव येथील शिबिराचे उद्घाटन आमदार मोनिकाताई राजळे यांचे हस्ते आज झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या.
राजळे यांनी, शिबिराच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासनाच्या योजनाची एकत्रित माहिती विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना मिळणार आ दे- बार्टी, सारथी, महाज्योती या माध्यमातून शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात, आगामी काळात व्यावसायिक क्षेत्रात मोठे रोजगार उपलब्ध होणार असून आपल्या शेजारील छत्रपती संभाजीनगर, पुणे, अहमदनगर येथील एमआयडीसीत नोकरीच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. असे सांगून शेवगाव व पाथर्डी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येतील तसेच दोन्ही ठिकाणी नवीन अभ्यासक्रम शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात येतील अशी ग्वाही दिली.
यावेळी नायब तहसीलदार रविंद्र सानप, नगरचे सहा युक्त निशांत सूर्यवंशी, जिल्हा व्यवस्थापक ओबीसी महामंडळ दिनेश चव्हाण, उद्योजक सचिन गोमासे, दत्त प्रसाद कराळे, व्याख्याते ज्ञानेश्वर आनावडे, जिल्हा समन्वयक मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचे गणेश मोरे, अर्जुन देशमुख, कैलास वाघमारे, उमेश पालवे, शेवगाव औ.प्र.संस्थेचे प्राचार्य अजय वाघ, कर्मचारी वृंद, शिबिरासाठी युवकांची मोठी संख्या लक्षणीय होती, यावेळी ८६० जणांनी शिबिरासाठी नावनोदणी केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा व्यवस्थापक व प्रशिक्षण अधिकारी सुनील शिंदे यांनी केले. राजेंद्र सदावर्ते यांनी सुत्रसंचलन केले, प्राचार्य उमेश पालवे यांनी आभार मानले.