कोपरगाव प्रतिनिधी, दि. २७ : कोपरगाव येथील तहसील कार्यालयामध्ये सध्या ऑनलाईन संगणक प्रणाली ठप्प असल्याने जातीचे दाखले, रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र आणि इतर प्रमाणपत्र तसेच महात्मा फुले जनआरोग्य योजनेसाठी आवश्यक दाखले मिळण्यात नागरिकांना अडचणी येत आहेत. प्रशासनाने नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी दूर करून आवश्यक ते प्रमाणपत्र लवकरात लवकर देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी भाजपच्या माजी प्रदेश सचिव तथा कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या प्रथम महिला आमदार स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांनी केली आहे.
विद्यार्थ्यांना व नागरिकांना विविध कामांसाठी रहिवासी प्रमाणपत्र, जातीचे व उत्पन्नाचे प्रमाणपत्र, नॉन क्रीमिलेअर प्रमाणपत्र आणि इतर प्रमाणपत्र गरजेचे असते. शासन स्तरावर जनकल्याणाच्या अनेक योजना राबविण्यात येत असतात. सदर योजनांचा लाभ मिळवण्यासाठी रहिवासी प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र आणि इतर विविध प्रमाणपत्रे सादर करावी लागतात. तहसील कार्यालयातून ही सर्व प्रमाणपत्रे प्राप्त करण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता विद्यार्थ्यांना व नागरिकांना करावी लागते.
तहसील कार्यालयात नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर अर्जदार नागरिकांच्या अंगठय़ाचा ठसा ‘इलेक्ट्रॉनिक पॉइंट ऑफ सेल’ (ई-पॉस) मशिनद्वारे घेतला जातो. कोपरगाव येथील तहसील कार्यालयामध्येही विद्यार्थ्यांना व नागरिकांना जातीचे दाखले व इतर विविध प्रमाणपत्रे देण्यासाठी ऑनलाईन संगणक प्रणालीचा अवलंब केला जात आहे.
मात्र, गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थ्यांना व नागरिकांना तहसील कार्यालयातून विविध प्रमाणपत्रे मिळण्यात अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची व नागरिकांची मोठी कुचंबणा होत आहे, असे स्नेहलताताई कोल्हे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
तहसील कार्यालयामध्ये जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र आणि इतर प्रमाणपत्रांसाठी बायोमेट्रिक प्रणालीद्वारे थंब इम्प्रेशन घेतले जाते; परंतु सध्या येथील तहसील कार्यालयातील बायोमेट्रिक प्रणालीमध्ये तांत्रिक दोष उदभवत असून, त्यामुळे विद्यार्थ्यांना व नागरिकांना आवश्यक ती प्रमाणपत्रे मिळत नाहीत. कोपरगावच्या तहसीलदारांवर एका प्रकरणात कारवाई झाल्याने सध्या प्रभारी अधिकाऱ्यांकडे त्यांचा पदभार सोपविण्यात आला आहे.
थंब इम्प्रेशन घेण्याचा अधिकार तहसील कार्यालयातील वर्ग-१ च्या अधिकाऱ्यांना देण्यात यावा, जेणेकरून विद्यार्थ्यांची व नागरिकांची कुचंबणा थांबेल. बारावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, येत्या काही दिवसांत दहावी परीक्षेचाही निकाल जाहीर होणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी तसेच विविध शिष्यवृत्ती योजनांचा लाभ घेण्यासाठी उत्पन्न दाखला, जात प्रमाणपत्र, डोमिसाईल (अधिवास) प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, नॉन क्रीमिलेअर प्रमाणपत्र व इतर प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असते.
ही सर्व प्रमाणपत्रे सादर केल्याशिवाय विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी प्रवेश मिळत नाही तसेच विविध शिष्यवृत्ती योजनांचा लाभदेखील मिळत नाही. याशिवाय महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविल्या जात असलेल्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत सवलतीच्या दरात उपचार घेण्यासाठी रुग्णांना आवश्यक ती वैद्यकीय व इतर प्रमाणपत्रे सादर करावी लागतात. ही प्रमाणपत्रे तहसील कार्यालयातून मिळवावी लागतात. मात्र, तहसील कार्यालयात आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करूनही विद्यार्थ्यांना व नागरिकांना प्रमाणपत्रे सहजपणे मिळणे कठीण झाले आहे. प्रभारी तहसीलदारांनी याकडे त्वरित लक्ष देऊन ही गैरसोय तातडीने दूर करून विद्यार्थ्यांना व नागरिकांना लागणारी प्रमाणपत्रे लवकरात लवकर देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी स्नेहलताताई कोल्हे यांनी केली आहे.
यासंदर्भात स्नेहलताताई कोल्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून कोपरगाव येथील तहसील कार्यालयात विद्यार्थ्यांना व नागरिकांना विविध प्रमाणपत्रे मिळण्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्याची मागणी केली आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महसूल विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना योग्य ते निर्देश देऊन विद्यार्थ्यांची व नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी विनंती स्नेहलताताई कोल्हे यांनी केली आहे.