पाणी पुरवठा योजनेबाबत शेवगावकरांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

 ५ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी, ठेकेदार आणि नगरपरिषदचे अभियंता यांची बैठक

शेवगाव प्रतिनिधी, दि. १ : शेवगावला १० -१५ दिवसातून नळाला अल्पकाळ पाणी सुटते. या जिव्हाळ्याच्या व ज्वलत प्रश्नावर येथे विविध पक्ष व संघटना रोजच अधुन मधून अर्ज, विनंत्या, उपोषणे, आंदोलने करत असतात पण प्रशासनाला अद्याप जाग येत नाही. त्यातच शहरासाठी मंजूर केलेल्या ८२ कोटी रु खर्चाच्या नळ पाणी पुरवठा योजनेची वर्क ऑर्डर होऊन आज सहा महिने झालेत तरीही प्रत्यक्ष कामाला सुरवात होईना म्हणून येथील
सामाजिक कार्यकर्ते प्रेमसुख जाजू यांनी सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्ते यांचेसह जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांची भेट घेवून चर्चा केली.

निवेदन देवून दहा दिवसात काम सुरु झाले नाही तर उपोषण आंदोलनाचा तसेच उच्च न्यायालयात दाद मागण्यात येणार असल्याचा निर्वाणीचा इशारा देण्यात आला. त्यावर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकार्यांनी लगेच ५ डिसेंबरला सर्व संबंधित एजन्सी व या कार्यकर्त्याच्या संयुक्त बैठकीचे आदेश जारी केले आहेत.

        याबाबत सविस्तर वृत्त असे की, शेवगाव नगरपरिषदेने ८२ कोटीच्या नियोजित पाणीपुरवठा योजनेची वर्कऑर्डर देऊन सहा महिने झाले असताना सुद्धा प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही. यासंदर्भात  नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पाणीपुरवठा योजनेचे कन्सल्टंट, योजनेचे ठेकेदार आणि नगरपरिषदचे पाणीपुरवठा अभियंता व या शिष्टमंडळाची जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी ५ डिसेंबर रोजी बैठक आयोजित करण्यात आली आहे. 

यावेळी रखडलेल्या पाणी योजनेमध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करून संबंधित पाणी योजनेचे त्वरित काम सुरू करण्याचे आदेश देण्याचे आश्वासन देखील शिष्टमंडळाला मिळाले असल्याचे येथे सांगण्यात आले.

शिष्ट मंडळात सामाजिक कार्यकर्ते प्रेमसुख जाजू, भाजपाचे प्रदेश सचिव अरुण मुंडे, माजी नगरसेवक अशोक आहूजा, कमलेश गांधी, कैलास तिजोरे, अजय भारस्कर, दिगंबर काथवटे, अंकुश कुसळकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता फुंदे, सामाजिक कार्यकर्ते अविनाश देशमुख,  बाबु सय्यद, राहुल  बंब, भूषण देशमुख, केदारनाथ तोतला आदि कार्यकर्त्यांचा सहभाग होता.

      येत्या दहा दिवसांमध्ये तोडगा न निघाल्यास शेवगाव तहसील कार्यालया समोर शहरातील विविध सामाजिक संघटना व सर्व राजकीय पक्ष व सर्वसामान्य शेवगावकर नागरिक मोठ्या प्रमाणात बेमुदत उपोषण करण्याचा व शहर बंद करून मोठ्या प्रमाणात आंदोलन उभारणार असल्याचे तसेच १० दिवसात योजनेचे काम सुरु न झाल्यास उच्च न्यायालयाच्या खंड पिठाचे दरवाजे ठोठावण्याचा निर्धार जाजू यांनी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केला.