डेंग्यू आजाराने घातले थैमान, १६ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू

शेवगाव प्रतिनिधी, दि.०१ : तालुक्याच्या पूर्व भागातील बालमटाकळी तसेच परिसरातील काही गावात डेंग्यू सदृष्य आजाराने थैमान घातले आहे. बालम टाकळीच्या गणेश पांडूरंग वैद्य (वय १६) या इयत्ता १०वीच्या विद्यार्थीचे या आजाराने नुकतेच निधन झाल्याची दूर्घटना घडल्याने तसेच परिसरातील  खाजगी रुग्णालयात काही डेंग्यूचे रुग्ण उपचार घेत असल्याने येथे घबराटीचे वातावरण पसरले आहे.

पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजेश कदम आरोग्य अधिकारी, डॉ. संदिप घुले यांच्या सह आरोग्य सेवक, सेविका, आशा स्वयंसेविकांचे पथक बालम टाकळीत दाखल झाले, असून त्यांनी युद्ध पातळीवर घर सर्वेक्षण मोहिम हाती घेतली आहे. साठविलेल्या पिण्याच्या पाण्याचे नमुने घेऊन तपासणीसाठी नगरला पाठविले आहेत. गावात फॉगिग मशीनच्या सहाय्याने फवारणी मोहिम राबविली जात आहे.

अवकाळी पावसामुळे सांचलेल्या पाण्याच्या डबक्यातील डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विशेष दक्षता घेण्यात येत असून घरात साठवलेले पिण्याचे पाण्यात मेडिक्लोअर टाकून, तुरटी फिरवून, उकळून गार केलेले पाणी पिण्यासाठी वापरण्या बाबत प्रबोधन केले जात आहे. नवनिर्वाचित सरपंच डॉ. राम बामदळे, उपसरपंच सर्जेराव घोरपडे, कृ.उ बाजार समितीचे माजी सभापती रामनाथ राजपुरे, विठ्ठल देशमुख, भारत घोरपडे, बंडू शिंदे ,वाल्मिक सुळे आदि मदत कार्यात योगदान देत आहेत.

सध्या बोधेगाव बालमटाकळी सह ७ गावच्या नळपाणी पुरवठा योजनेतून १५-२० दिवसातून पाणी पुरवठा होत असल्यामुळे पाणी साठवून पिण्यासाठी वापरावे लागते. त्यातच परिसरात डेंग्यू सदृश आजाराची साथ सुरू झाल्याने सार्वजनिक स्वच्छता व जनतेच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.