१३१.२४ कोटीच्या ५ नं.साठवण तलावाचे कॉंक्रीटीकरनाच्या कामास प्रारंभ
कोपरगाव प्रतिनिधी, दि. १२ : ५ नं.साठवण तलाव झाल्यास आपले पाण्यावर चालणारे राजकारण बंद होईल अशी भीती असणाऱ्यांनी ५ नं.साठवण तलावाला छुपा विरोध केला. दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून न्यायालयात देखील गेले. मात्र कोपरगावकर माझ्या सोबत होते. कोपरगावकरांचा तमाम माता-भगिनीचा आशिर्वाद माझ्या पाठीशी होता. त्यामुळे छुपा विरोध होवूनही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सहकार्याने व कोपरगावकरांच्या आशीर्वादाने पाणी प्रश्न सोडविण्याचा शब्द पाळला असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव तालुक्यातील येसगाव येथे जाहीर कार्यक्रमात सांगितले.
कोपरगाव शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी आ.आशुतोष काळे यांच्या विशेष प्रयत्नातून महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियानाअंतर्गत १३१.२४ कोटी रुपये निधीतून करण्यात येणाऱ्या नवीन पाचव्या साठवण तलावाच्या काँक्रिटीकरणाच्या कामाचा शुभारंभ नुकताच आशुतोष काळे व त्यांच्या सुविद्य पत्नी जिल्हा बँकेच्या माजी संचालिका चैताली काळे यांच्या हस्ते विधिवत पूजन करून हजारो कोपरगावकरांच्या उपस्थितीत येसगाव येथे पार पडला यावेळी आयोजित जाहीर कार्यक्रमात बोलत होते. यावेळी महिलांनी आ.आशुतोष काळे यांचे औक्षण करून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिलासह विविध संघनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचा सत्कार करून आभार मानले.
येत्या ८ महीण्यात नवीन साठवण तलावाचे काम पुर्ण करून जनतेला पाणी दररोज मिळण्याची व्यवस्था केल्याचे काळे यांनी सांगताच उपस्थितांनी टाळ्या वाजवून काळे यांचे अभिनंदन केले.
यावेळी पुढे बोलतांना काळे म्हणाले की, कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी माजी आमदार अशोकराव काळे यांनी देखील १२ वर्षापूर्वी त्यांच्या कार्यकाळात चार नं.साठवण तलावाची क्षमता वाढविण्यासाठी २ कोटीचा निधी आणला होता. परंतु त्यावेळी दुर्दैवाने ते काम होवू शकले नाही. ते काम पूर्ण झाले असते तर २०२१ पर्यंत पाणी टंचाई जाणवली नसती. कोपरगाव शहरातील नागरिकांच्या दारासमोर असलेल्या पाण्याच्या टाक्या पाहून मनाला वेदना होत होत्या. त्यावेळी कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न कायमचा सोडवायचा असा निश्चय केला होता. हा प्रश्न सोडविण्यासाठी केलेल्या अभ्यासातून असे दिसून आले की, कोपरगाव शहराला आवश्यक असणारा पाणी साठा आरक्षित आहे मात्र साठवण क्षमता नसल्यामुळे पाणी टंचाई जाणवत आहे.
पाणी प्रश्न सोडवायचा असेल तर साठवण क्षमता वाढविणे गरजेचे होते. त्यामुळे सत्ता नसतांना देखील कोपरगावच्या नागरिकांची पाण्यासाठी होणारी वणवण थांबावी यासाठी ५ नं. साठवण तलावाचे काम सुरु करावे यासाठी आग्रह धरला, संघर्ष केला, आंदोलन, उपोषण केले. मात्र सत्ता नसल्यामुळे हात बांधलेले होते. त्यामुळे २०१९ च्या विधानसभा निवडणुक प्रचारात पाणी प्रश्न सोडविण्याचा दिलेला शब्द दोनच महिन्यात ५ नं. साठवण तलावाचे काम सुरु करून आश्वासक सुरुवात केली. समृद्धी महामार्गाचे काम करणाऱ्या गायत्री कंपनीकडून मोफत खोदकाम करून घेवून कोपरगावच्या जनतेचे सहा कोटी रुपये वाचविले. मात्र काम सुरू असतांना चांगल्या कामात अडचणी आणणाऱ्या काही विघ्नसंतोषी व्यक्तींनी अनेक अडचणी आणण्याचं काम करून दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेऊन कोर्टामध्ये केस दाखल केली.
शासनाला अनेक प्रकारचे निवेदन दिले. काम बंद पाडण्यासाठी काही लोकांना आंदोलन करायला लावले. मात्र आपल्रे आशीर्वाद पाठीशी असल्यामुळे या अडचणींवर मात करून कोपरगावच्या जनतेला दिलेला शब्द पूर्ण केला याचे मोठे समाधान वाटत असल्याचे त्यांनी सागितले. माझ्यावर विश्वास दाखवून पाणी प्रश्नाबरोबरच कोपरगाव शहराच्या विकासासाठी निधी देवून विकासाचे प्रश्न मार्गी लावले. शहराच्या विकासाचे अजूनही प्रश्न बाकी आहेत. कोपरगाव शहर विकासाच्या बाबतीत अव्वल करण्यासाठी येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी मी दिलेले उमेदवार निवडून द्या असे आवाहन केले.
याप्रसंगी महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, अजित लोहाडे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे, राजेश ठोळे, सौ. सुधाताई ठोळे, तुलसिदास खुबानी, ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे अध्यक्ष विजय बंब, मुख्याधिकारी शांताराम गोसावी, एजन्सीचे प्रमुख राजेंद्र सनेर, महेश पटेल, अरविंद भंसाळी, संजय भंसाळी, मनीष फुलपगर,, कांतीशेठ पटेल, डॉ.अजय गर्जे, किराणा मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र बंब, दीपक विसपुते, सतीश कृष्णाणी, मंदार आढाव, सलीम पठाण, संदीप रोहमारे, सुनील फंड, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे,
कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन दिलीपराव बोरनारे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष माधवराव खिलारी, शहराध्यक्ष सुनील गंगूले, शिवसेना माजी शहराध्यक्ष भरत मोरे, माजी नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, मंदार पहाडे, संदीप पगारे, प्रतिभा शिलेदार, माधवी वाकचौरे, वर्षा गंगुले,अजीज शेख, तसेच माजी नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व माजी जिल्हा परिषद-पंचायत समिती सदस्य, पदाधिकारी, कार्यकर्ते, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व संलग्न संस्थांचे आजी माजी संचालक कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती,आजी माजी संचालक, महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत माजी नगरसेवक मंदार पहाडे यांनी केले.प्रास्तविक राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे यांनी केले तर आभार शहराध्यक्ष सुनील गंगुले यांनी मानले.
यावेळी चैताली काळे बोलताना म्हणाल्या, नविन तयार होणाऱ्या या तलावाच्या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार येथील उपस्थित नागरिक आपल्या भावी पिढीला साक्ष देतील. विरोधक अफवा पसरवत आहेत. तलावाचे काम बंद होणार आहे असे गैरसमज पसरवून दिशाभूल केली जाते पण आज प्रत्यक्ष तलावात बसुन कामाची पाहणी आपण सर्व नागरिक करताय . आशुतोष काळे हेच या शहरातील नागरिकांना दररोज पाणी देवु शकतात असा ठाम विश्वास व्यक्त करीत विरोधकांचा समाचार घेतला.
यावेळी राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे म्हणाले, कोपरगावचा पाणी प्रश्न गेल्या ७० वर्षांपासूनचा जशास तसा आहे.पाण्यावरून दंगल झाली, अनेक आंदोलने झाले. पण पाणी दररोज मिळाले नाही माञ आता आशुतोष काळे यांनी तयार केलेले तळे पासुन पाणी मिळण्याची खाञी पटत आहे. काळे यांचे कार्य अभिनंदनीय आहे. जेव्हा या नवीन तळ्यातुन नळाला दररोज पाणी येईल तेव्हा कोपरगावकर आशुतोष काळे यांचे गुढ्याउभारून स्वागत करावेत अशी आशा व्यक्त केली. दरम्यान आमदार आशुतोष काळे व चैताली काळे यांनी आपल्या हाताने सिमेंट काॅंक्रीटची पाटी भरुन डोक्यावर घेतली आणि काॅंक्रीटीकरणाच्या ठिकाणी टाकली. उपस्थित नागरिकांनी फटाक्यांची आतिषबाजी बाजी करुन आनंद व्यक्त केला.
कार्यक्रमासाठी महिलांची संख्या लक्षणीय होती. कार्यक्रम सुरु झाल्यानंतर सौ.चैतालीताई काळे यांनी व्यासपीठावर न जाता सरळ महिलांमध्ये जावून बसल्या. एक महिला म्हणून त्यांच्या देखील चेहऱ्यावर पाणी प्रश्न सुटणार असल्याचा आनंद दिसून येत होता. यावेळी त्यांनी दाखविलेला साधेपणा हा तर चर्चेचा विषय झालाच परंतु ५ नंबर साठवण तलावाच्या बाबतीत ५ नं.साठवण तलावाचे काम बंद पडले, साठवण तलाव होणार नाही अशा अफवा पसरविणाऱ्यांचा देखील त्यानी आपल्या भाषणात चांगलाच समाचार घेतला. ज्या साठवण तलावाच्या तुम्ही खोट्या अफवा पसरविता त्याच तलावातून तुमच्या शेतात पाईप लाईन जातात हे विसरू नका असा रोख ठोक ईशारा चैताली काळे यांनी दिला.