शेवगाव प्रतिनिधी, दि.९ : तालुक्यातील सुळेपिंपळगाव येथील सचिन ज्ञानेश्वर देशमुख या युवकाचे गेल्या वर्षी अपघाती निधन झाले होते. देशमुख कुटूबियांनी त्याच्या प्रथम स्मृतीदिनाचे औचित्य साधून अन्य खर्चाला फाटा देत ग्रामिण भागातील शंभर विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा म्हणून शाळेत जाण्यासाठी सायकलीचे वाटप करून चि. सचिनच्या स्मृती जागविण्याचा निर्णय घेतला आहे. देशमुख कुटूंबाच्या निर्णयाचे परिसरात कौतूक होत आहे.
परिसराचे श्रद्धा स्थान, आखेगांवच्या श्री जोग महाराज संस्कार केंद्राचे प्रवर्तक राम महाराज झिंजुर्के यांचे हस्ते मंगळवारी (दि. ११) सकाळी दहाला या सायकलीचे वितरण करण्यात येणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील चेडेचांदगाव, सुळेपिंपळगाव, अंतरवाली बुद्रुक व खुर्द, बेलगाव, शोभानगर या सहा गावातील विदयार्थ्यांची शाळेला जाण्यायेण्याची सोय होणार आहे. यावेळी हभप विशाल महाराज खोले यांचे कीर्तन होणार आहे. तरी पणया कार्यक्रमास परिसरातील ग्रामस्थ व विदयार्थ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन भक्ती नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष राहुल देशमुख कुटूंबियांनी केले आहे.