उसतोडणी कामगार व वाहतुकदारांनी कायद्याची जागृकता बाळगावी – एस.बी.कोऱ्हाळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२४ :  आपण बेकायदा केलेल्या कृत्याची शिक्षा स्वतःबरोबरच समाजालाही भोगावी लागते, व्यसनाधिनता अपघाताला प्रोत्साहन देते, कायदे आपल्या सुरक्षीततेसाठी आहेत, त्याचे रस्ते वाहतुकीत पालन करा, निष्काळजीपणा टाळा, रस्त्यावर वाहन चालवितांना परवाना तपासा, क्षमतेपेक्षा जास्त माल वाहनात भरू नका, अपघात घटना घडुन गेल्यानंतर पश्चाताप करण्यापेक्षा कायद्याची जागरूकता प्रत्येक उसतोडणी कामगार, ट्रकचालक, मालक, उस वाहतुकदारांनी घ्यावी असे आवाहन कोपरगाव येथील जिल्हा न्यायाधिश एस. बी. को-हाळे यांनी केले.

तालुक्यातील शिंगणापुर येथील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर तालुका विधी सेवा समिती, वकील संघ कोपरगाव यांच्या सहकार्याने मंगळवारी कायदेविषयक जनजागृती शिबीर घेण्यांत आले, त्यात ते मार्गदर्शन करतांना बोलत होते. संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांच्या हस्ते सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यांत आला. 

प्रारंभी कोपरगाव बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष विधीज्ञ अशोक दुपके यांनी प्रास्तविक करतांना सांगितले की, मनुष्य छोटया छोटया गोष्टीकडे दुर्लक्ष करतो त्यातुन ओढवणारे संकट मोठे आहे. रस्ते वाहतुक करतांना, वाहने चालवितांना प्रत्येकाने काळजी घ्यावी, वाहनाचा विमा उतरवुन रस्त्यावरून प्रवास करावा जेणेकरून एखादा अपघात घडला तर त्याच्या नुकसानभरपाईची झळ वाहनमालकांना अगर चालविणा-यांना जास्त प्रमाणात बसणार नाही. सरकारी वकील ए. एल. वहाडणे, विधीज्ञ विजय गवांदे व कोपरगाव तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष विधीज्ञ एम. पी. येवले यांचीही यावेळी भाषणे झाली. 

न्यायमूर्ती एस. बी. को-हाळे पुढे म्हणाले की, उसतोडणी कामगार, उस वाहतुकदारांचे समुपदेशन ही काळाची गरज आहे, कायदे आपल्या सुरक्षीततेसाठी आहेत. सर्वोच्च व मुंबई उच्च न्यायालय, संभाजीनगर खंडपिठात मोठ्या प्रमाणांत दावे दाखल झाल्याने ग्रामपातळीवरच्या घटकापर्यंत कायदेविषयक जागृकता व त्याबाबत घ्यावयाची काळजी याची शिबीरे भरून जनजागृती करावी असे निर्देश दिले आहेत.

चुकून अपघात झाला तर पोलिसाना सांगा, आवश्यक तेथे त्यांची मदत घ्या, जुगाडाच्या सहाय्याने उस वाहतुक करतांना प्रत्येकाने काळजी घ्यावी, काही साखर कारखाना कार्यस्थळावर उसतोडणीदार, वाहतुकदार चालक मालकांसाठी पायाभूत सुविधांचा अभाव आहे त्याकडे संचालक मंडळ अधिका-यांनी वेळीच लक्ष पुरवावे. चालकाचा निष्काळजीपणा स्वत:बरोबरच दुस-यांच्याही जीवीतहानीस कारणीभूत ठरत असतो असे ते म्हणाले. शेवटी कार्यकारी संचालक बाजीराव सुतार यांनी आभार मानले.

याप्रसंगी अमृत संजीवनी शुगरकेन संस्थेचे संचालक गोपिनाथ गायकवाड, उस व्यवस्थापक जी. बी. शिंदे, उपशेतकी अधिकरी सी. एन. वल्टे, विधिज्ञ किरण म्हस्के, विजय नरोडे, सुरक्षा अधिकारी रमेश डांगे, सर्व खातेप्रमुख, उपखातेप्रमुख, कर्मचारी ऊस तोडणी मजूर ट्रक चालक-मालक वाहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.