घटनेच्या निषेधार्थ निषेध मोर्चा, विद्यार्थ्याविरुद्ध गुन्हा दाखल
पाथर्डी प्रतिनिधी, दि. ११ : पाथर्डी येथील शाळेमध्ये एकाच वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थाने वर्गातीलच अल्पवयीन विद्यार्थिनीला शस्त्राचा धाक दाखवून काही काळ घराच्या खोलीत बंद करत लग्न करण्यासाठी धमकी दिली. हा प्रकार सोमवारी सकाळी उघडकीस येऊन संबंधित विद्यार्थ्याविरुद्ध सायंकाळी उशिरा गुन्हा दाखल झाला या घटनेच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाने काढलेल्या निषेध मोर्चास आज उस्फुर्त प्रतिसाद मिळून शेवगाव तिसगाव येथूनही हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते शहरात दाखल झाले. सकाळी कसबा विभागातील शिवाजी पुतळ्यापासून निषेध मोर्चाला प्रारंभ होऊन मेन रोड, अजंठा चौक, नाईक चौक मार्गे मोर्चा पोलीस स्टेशनला पोहोचला.
निषेध सभेपुढे बोलताना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या भारती असलकर म्हणाल्या, गेल्या चार दिवसांपूर्वी संबंधित विद्यार्थ्यांनी शस्त्र दाखवून तिला धमकावले घरी सांगितल्यास शाळा बंद होईल, या भीतीने तिने घरी घडलेला प्रकार सांगितला नाही. काल सकाळी पोटदुखीचा त्रास होऊ लागल्याने शिक्षकांना विचारून विद्यार्थिनी घरी निघाली. शाळेच्या कंपाऊंडच्या बाहेर तिला एक तरुणी भेटली तुझी तब्येत बरी नाही, तर मी तुझे दप्तर घेते तू माझ्याबरोबर चल असे म्हणत विद्यार्थ्यांच्या घरी नेले येथे विद्यार्थ्यांनी दार बंद करून सुमारे तीन तास तिला बाहेर पडू दिले नाही.
शस्त्राचा धाक दाखवून लग्नाची सक्ती तो करीत होता. परिस्थितीचा अंदाज घेत विद्यार्थिनी तेथुन पळ काढून घर गाठले. घरी सर्व हकीगत सांगितल्यावर त्यांनी गावातील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना कळवून पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांनी तात्काळ हालचाली करत संबंधित विद्यार्थ्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. रात्री उशिरा विद्यार्थ्यांशी संबंधित एका महिलेने विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांना धमकवली अशी माहिती आंदोलना दरम्यान सांगण्यात आली.
यावेळी बोलताना भाजपचे अर्जुन धायतडक म्हणाले घरच्यांच्या संमतीशिवाय असा प्रकार होऊ शकत नाही. बेकायदा सावकारांच्या जाळ्यात गरिबांना आडून सर्व प्रकारचा त्रास लोकांना सहन करावा लागतो आता पोलिसांनी लक्ष न घातल्यास आम्ही आमचे संरक्षण करू शकतो. विधिज्ञ प्रतीक खेडकर म्हणाले, पोलिसांनी संबंधिताला त्वरित ताब्यात घेऊन आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आहे. पोलिसांनी कर्तव्यात कसलाही कसूर केलेला नाही.
मात्र फोन कॉल, यामध्ये सहभागी असणारे, अन्य व्यक्तीचा शोध लावून कारवाई व्हावी. शहरात गुन्हेगारी मनोवृत्तीच्या लोकांमुळे सार्वजनिक शांतता धोक्यात येऊन तणाव वाढत आहे. शाळा कॉलेज परिसरात विविध चौकांमध्ये गस्त वाढवून, रस्त्याने वेडी वाकडी वाहने चालवणारे, विद्यार्थिनींना गर्दीच्या ठिकाणी धक्के मारणारे, वाहतूक कोंडी करणाऱ्या विरुद्ध रस्त्यावरच कारवाई व्हावी. जातीय व धार्मिक तणाव वाढवण्यास कारणीभूत ठरणाऱ्या विरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंदले जावेत.
यावेळी माजी नगरसेवक रामनाथ बंग, मनसेचे तालुकाध्यक्ष संतोष जिरेसाळ, अतिश निराळी रामदास बर्डे शिवसेनेचे भगवान दराडे युवा मोर्चाचे अमोल गर्जे, मुकुंद गरजे, भाजपचे सचिन वायकर, बन्सी मस्के शेवगाव आदींनी आपले विचार मांडले. जय श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय.भवानी, जय शिवाजी आदी घोषणांनी आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला.
पोलीस उपाधीक्षक सुनील पाटील आंदोलनादरम्यान पोलीस स्टेशनला तळ ठोकून होते. पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी आंदोलकांशी संवाद साधत या प्रकाराबाबत सर्व अंगांनी तपास वेगाने सुरू असून कसलीही हयगय केली जाणार नाही. या कामासाठी विविध पथके तैनात केली आहेत. सर्व शाळा, महाविद्यालयांमध्ये प्रांताधिकारी, तहसीलदार व पोलीस अधिकाऱ्यांचा विद्यार्थ्यांची संवाद घडवून कोणताही प्रकार घडल्यास कसा व कोणाशी संपर्क साधावा, याची माहिती देऊ.
दामिनी पथक कार्यरत करून विविध चौकांमध्ये, पोलिसांची गस्त वाढवु. शहर हद्दीचे प्रमुख व पोलीस अधिकाऱ्यांचे नंबर विद्यार्थी विद्यार्थिनींना देऊ, पोलीस उपनिरीक्षक सचिन लिमकर यांचे सारखा कर्तव्यदक्ष अधिकारी तपास करीत आहे. लोकांनी शांतता राखण्याचे त्यांनी आवाहन केले. अनुचित प्रकार घडू नये म्हणून आंदोलनाला दरम्यान पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. शहरातही फिरती गस्त सायंकाळपासून सुरू झाली आहे.