कोपरगाव प्रतिनिधी दि. १९ : श्रावण पर्जन्यमान सरीमुळे शहरातील खाचखळग्यांना डबक्याचे स्वरूप आले आहे. शहराला आठ दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने गटारी देखील जागोजागी तुंबलेल्या आहेत. त्यामुळे साथीच्या आजारात वाढ होवु लागली आहे. लहान मुले-मुली, अबालवृध्द आजारी पडून दवाखान्यात रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे, तेंव्हा पालिकेने तात्काळ शहरातील सर्व प्रभागात जंतूनाशक औषध फवारणी करून साथीचे आजार रोगराईला प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी कोपरगाव शहर भारतीय जनता पार्टी अनुसुचित जाती-जमाती मोर्चाचे शहराध्यक्ष शंकर बि-हाडे यांनी एका निवेदनाद्वारे मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांच्याकडे केली आहे.
प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, तत्कालीन आमदार स्नेहलता कोल्हे तसेच जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा युवा मोर्चाचे पदाधिका-यांनी पावसाळा सुरू होण्यापुर्वी आरोग्याला महत्व देवून स्वच्छता अभियानात घरोघर जागुन त्याबाबत मोठया प्रमाणात जनजागृती केली होती. साथीचे आजार होवु नये म्हणून उपाययोजनाही केल्या होत्या.
गेल्या आठ दिवसापासून ढगाळ हवामान आणि आषाढ-श्रावणसरी बरसत आहेत. त्यातच शहरातील प्रमुख रस्त्याला मोठया प्रमाणात खडडे पडले आहेत, खाचखळग्यांना डबक्याचे स्वरूप आले. याठिकाणी वेळीच जंतूनाशक फवारणी न झाल्याने प्रार्दुभाव वाढून लहान मुले मुली तापाने फणफणु लागली आहेत. रात्री अपरात्री नागरीक, हॉटेल व्यावसायिक, हात गाड्यावर अन्नपदार्थ विकणारे भटक्या कुत्र्यांसाठी ऊरसुर, शिळ अन्न रस्त्यावर फेकतात त्यातूनही जंतुसंसर्ग वाढत आहे.
गटारी तुंबून डासांचे साम्राज्य निर्माण झाले आहे, उपनगरात कचऱ्यांचे ढीग वाढत आहे, नेहरू भाजीबाजार, उघडयावर भाजीपाला विक्री करणारे, आठवडी बाजारात उघडयावर पडणारे कच-याचे ढिग, सार्वजनिक स्वच्छतागृहांना पाण्याच्या कमतरतेमुळे मलमुत्र विसर्जनात येणारे अडथळे, वाढते धुळीचे साम्राज्य, रस्त्यावर होणारी गाळमिश्रीत चिकचिक यातुन जीवजंतु, डास, डेंगु डास वाढून आजारपण उदभवत आहे. भटकी कुत्री, गाढवे, डुक्कर, मोकाट जनावरांच्या विष्टा रस्त्यावर पडून त्यातून घराघरात साथीचे आजार वाढत आहे.
परिणामी दवाखान्यात डेंगु, मलेरिया, अदृष्य आजारांच्या रूग्ण संख्येत वाढ झाली आहे. जंतूनाशक फवारणी, किटकनाशक पावडर धुराळणी न झाल्याने रोगराईला प्रोत्साहन मिळत आहे. तेंव्हा पालिका प्रशासनाने शहर स्वच्छतेला प्राधान्य देवुन सर्व कच-याची विल्हेवाट लावुन, ततुंबलेल्या गटारी, चेंबर स्वच्छ करून, तात्काळ डासप्रतिबंधक, जंतूनाशक औषध फवारणी हाती घ्यावी व शहरवासीयांना दिलासा द्यावा असे ते म्हणाले. याप्रसंगी सर्वश्री सतिष रानोडे, गोरख देवडे, सोमनाथ ताकवले, संजय खरोटे, रोहिदास पाखरे, नारायण गवळी, राहुल भागवत, गोरख वाडीले आदी उपस्थित होते.