शेवगाव प्रतिनिधी, दि. २० : शेवगावात हल्ली चोर्यांचे प्रमाण वाढले असून चोरट्याना आता चोरीसाठी देवस्थाने ही वर्ज्य राहिली नाहीत. चोरटे एवढे निर्ढावले आहेत की, देवाधिदेव महादेव वा देवादिकांनाही साडेसातीने ताडन करणाऱ्या शनिदेवाचीही त्यांना भिती वाटेनासी झाली आहे. किंबहूना चोरट्यांनीही नैतिकता सोडली असे म्हणण्याची वेळ आली आहे.
शेवगावातील ऐतिहासिक महादेव मंदिरातील दानपेटी फोडल्याल्या घटनेला आठवडाही झाला नाही तोच तालुक्यातील ताजनापुर येथील प्रसिध्द शनि मारुती मंदिरातील दानपेटीच चोरीला गेली आहे. शनि देवाची दान पेटीच चोरीला गेल्याची घटना उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली.
ग्रामस्थांनी शोध घेतला असता ही दानपेटी जवळच्या उसाच्या शेतात फोडलेल्या स्थितीत आढळली. मात्र दानपेटीतील रक्कम चोरट्यांनी लंपास केली असून याबाबत शेवगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे देवस्थान परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे.
गेल्या सोमवारी दिनांक १७ रोजी अमावस्या असल्याने तसेच अधिक मास सुरू झाल्याने येथे भाविकांची मोठी गर्दी सुरु झाली आहे. दर्शनासाठी आलेले भाविक दानपेटी मध्ये सढळ हाताने दान करतांना आढळतात. त्यामुळे दानपेटीत मोठी रक्कम जमा झाली असावी असा अंदाज बांधून अज्ञात चोरट्यांनी मंदिरातील दानपेटी पळवून नेऊन फोडली असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
मंदिराचे पुजारी मुकुंद मुळे हे नेहमीप्रमाणे शनि देवाच्या पूजेसाठी गेले असताना त्यांना मंदिराच्या आवारात असलेली दानपेटी दिसली नाही. त्यांनी याबाबत ग्रामस्थांना माहिती दिली. या घटनेची माहिती समजतात ग्रामस्थांनी मंदिर परिसरात गर्दी केली. चोरीस गेलेल्या दानपेटीचा ग्रामस्थांनी शोध घेतला असता त्यांना जवळच असलेल्या उसाच्या शेतामध्ये दानपेटी फोडलेल्या स्थितीत आढळून आली.
पोलिसांना चोरीच्या घटनेबाबत माहिती कळविल्यानंतर परीक्षाविधिन पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी हे पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मंदिराच्या परिसराची व फोडलेल्या दानपेटीची पाहणी केली ताजनापूर येथील शेतकरी आप्पासाहेब वीर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेवगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेवगावच्या ऐतिहासिक महादेव मंदिरातील दानपेटीचा अद्याप सुगावा लागला नाही तोच ही दूसरी घटना घडल्याने भाविकात नाराजी आहे.