एस.एस.जी.एम. महाविद्यालयात रानकवी ना.धो. महानोर यांना श्रद्धांजली अर्पण

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ०४ : हिरव्या रानाच्या बोलीचा शब्द झालेला रानकवी ना.धो. महानोर, कोपरगाव मराठीतील ख्यातनाम कवी, पद्मश्री ना.धो. महानोर यांचे नुकतेच पुणे येथे निधन झाले. त्यांना येथील एस.एस.जी.एम. महाविद्यालयाच्या मराठी विभागातर्फे नुकतीच श्रद्धांजली अर्पण करण्यात आल़ी.

याप्रसंगी आदरांजली व्यक्त करताना मराठी विभाग प्रमुख डॉ. उज्ज्वला भोर यांनी ना.धों. महानोर यांच्या काव्य कार्याचा परिचय देऊन सांगितले की, ना.धो. महानोर हे खऱ्या अर्थाने रानकवी होते.

बालकवींच्या नंतर आणि कवयित्री बहिणाबाईंच्या पुढे जाऊन महानोर यांनी रानाच्या विविध विभ्रमांची ओळख रसिकांना करून दिली. रानात एकरूप झालेले, रानाच्या संवेदना जाणणारे आणि शब्दातून व्यक्त करणारे, हिरव्या बोलीचा स्वतःच शब्द झालेले असे ते कवी होते.

त्यांच्या कवितेने रसिकांबरोबरच गानकोकिळा लता मंगेशकर सारख्यांनाही भुरळ घातली होती. त्यामुळे लतादीदींनी प्रत्यक्ष बोलावून जैत रे जैत साठी त्यांची गाणी घेतली. दोघी, सर्जा, अजंठा अशा अनेक चित्रपटांना ना.धों महानोर यांनी दिलेली गाणी आजही रसिकजणांच्या काना-मनात गुंजत आहेत.

महानोर यांची काव्यरचना आणि शब्दकळा प्रत्यक्ष त्या रानात जाऊन विजया राजाध्यक्षांसारख्या समीक्षकांनी समजून घेतली होती. लोकगीताचा संस्कार लेवून आलेली महानोर यांची कविता मराठी मातीतून चैतन्यगीत गाणारी ठरली.

ही परंपरा अशीच चालू राहावी, त्यासाठी विद्यार्थ्यांनी विविध कवींच्या कवितांचे वाचन करावे, असे आवाहन डॉ. भोर यांनी केले. मराठी विभागातील प्रा.डॉ. बाबासाहेब शेंडगे यांनी महानोरांसोबत व्यतीत केलेल्या आठवणींना उजाळा दिला.

महानोर यांच्या वडिलांच्या निधनाप्रसंगी महाराष्ट्राचे प्रतिभाशाली मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण स्वतःजातीने हजर होते. माननीय शरद पवारांनी महानोर यांच्या कवितांचे मर्म जाणले होते. त्यातूनच कवी महानोरांना विधान परिषदेवर जाण्याची संधी मिळाली होत़ी, असेही त्यांनी सांगितले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रमेश सानप यांच्या मार्गदर्शनानुसार झालेल्या या श्रद्धांजलीपर कार्यक्रमासाठी मराठी विभागातील विद्यार्थी आणि प्रा.रावसाहेब दहे आदींसह उपस्थित होते.