पाटबंधारे विभागाने बिगर सिंचनाच्या आवर्तनातून लाभक्षेत्रातील बंधारे भरुन द्यावेत- परजणे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १७ : पावसाळ्याचे अडीच महिने संपूनही समाधानकारक पाऊन पडला नसल्याने गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रातील खरीप पिके वाया जाण्याच्या मार्गावर आहेत. पाटबंधारे विभागाने गोदावरी कालव्याद्वारे सोडलेल्या बिगरसिंचनाच्या आवर्तनातून लाभक्षेत्रातील गांवतळे, बंधारे भरुन दिल्यास काही प्रमाणात पाण्याचा प्रश्न सुटू शकतो.

या परिस्थितीचा गांभिर्याने विचार करुन पाटबंधारे विभागाने गोदावरी उजव्या व डाव्या कालव्याचे पाणी लाभक्षेत्रातील शेतीसाठी सोडावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी शासनाकडे पत्राद्वारे मागणी केली.

मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांना यासंदर्भात परजणे यांनी पत्र पाठविले असून त्याद्वारे पाणी टंचाईची परिस्थिती निदर्शनास आणून दिली. गेल्या दीड महिन्यापासून पावसाने पाठ फिरवल्याने पिके पूर्णपणे धेक्यात आली आहेत. जनावरांच्या चाऱ्यांची व पिण्याच्या पाण्याची गंभिर समस्या निर्माण झालेली आहे.

गोदावरी कालव्याद्वारे बिगरसिंचनाचे आवर्तन सोडलेले आहे. मात्र या पाण्याचा शेतकऱ्यांना काहीच लाभ मिळत नाही. उलट हे पाणी नदीला मिळून पुढे जायकवाडी धरणाकडे जात आहे. हेच पाणी जर लाभक्षेत्रातील ग्रामीण भागातील गांवतळे, ठिकठिकाणच्या बंधाऱ्यामध्ये सोडून व ते भरून दिल्यास त्या पाण्याचा पिकांना व पिण्यासाठी चांगला लाभ होऊ शकतो. या गंभिर समस्येचा विचार होऊन बिगरसिंचनाच्या आवर्तनातून गांवतळे, बंधारे भरुन द्यावेत अशीही मागणी परजणे यांनी मंत्रिमहोदयांकडे पत्राद्वारे मागणी केली.