शेवगाव प्रतिनिधी, दि. २३ : सर्व सामान्याना फळे विकत घेत नाहीत, तेव्हा प्रत्येक व्यक्तीला स्वतः च्या घरची मोफत सेंद्रिय फळे खायला उपलब्ध व्हावीत म्हणून सामाजिक कार्यकर्ते तथा माझी वसुंधरा मोहिमे अंतर्गत राज्यात सलग दोनदा प्रथम पारितोषिक पटकावणाऱ्या तालुक्यातील वाघोली गावचे प्रणेते उमेश भालसिंग यांचे संकल्पनेतून ‘” घर तेथे झाड ” ही मोहीम परिसरात सुरू करण्यातआली आहे.
हे स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्यासाठी त्यांना बारामतीच्या ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या सहयोगातून भारत फोर्जचे मोठे योगदान लाभले आहे. प्रारंभी तालुक्यातील वाघोलीसह परिसरातील वडूले, चव्हाणवाडी, दिंडेवाडी , मळेगाव, निंबे नांदूर , फलकेवाडी या सात गावात हा उपक्रम हाती घेण्यात आला असून मंगळवारी (दि.२२ ) दिंडेवाडी व चव्हाणवाडी या दोन वाड्यात भालसिंग यांनी कार्यकर्त्यांसह घरोघरी जाऊन प्रत्येक घराजवळ खड्डे घेऊन दोन फळझाडे लावण्यात आली आहेत.
त्यासाठी केशर आंबा, चिकू, पेरू, जांभूळ, सिताफळ, फणस, बोर आदी फळझाडे उपलब्ध करण्यात आली आहेत. ही रोपे आणताना मुळातच वर्ष दोन वर्षाची मोठी रोपे आणण्यात आली आहेत. त्यामुळे काही दिवसातच प्रत्येकाला घरच्या घरीच स्वतःच्या मालकीची फळे उपलब्ध व्हावीत अशी धारणा आहे. काल या दोन्ही वाड्यात सहाशे फळझाडे लावण्यात आली.
या उपक्रमाद्वारे करण्यात येत असलेल्या वृक्षारोपणचे वैशिष्ट्य असे की, या रोपाचा सेंद्रिय गर्भ वाढण्यासाठी ‘जिओ टॅग’ ॲप द्वारे बारामती ॲग्रीकल्चर ट्रस्टच्या कार्यालयात प्रत्येक झाडाची स्थिती वर नियंत्रण ठेवून त्यावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. याशिवाय दोन महिन्यानंतर त्या फळझाडास जीवामृत वाटप करण्यात येणार आहे.
तर येत्या सोमवार पासून वाघोली गावात ‘ घर तेथे झाड ‘ उपक्रमान्तर्गत वृक्ष लागवड पंधरवडा राबविण्यात येणार असून वाघोलीत प्रत्येक घरी किमान पाच फळझाडे लावण्याचा निर्धार प्रकल्प संयोजक उमेश भालसिंग यांनी केला आहे.