शिक्षकांनी शाळेच्या गुणवत्ता वाढीसाठी सतत प्रयत्नशील राहावे- त्रिंबक फपाळ

शेवगाव प्रतिनिधी, दि. २५ : शैक्षणिक साहित्य हे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी अतिशय प्रभावी साधन असून वर्गातील विद्यार्थ्यांचे गट तयार करून त्यांना शैक्षणिक साहित्य हाताळू द्यावे. त्याद्वारे विद्यार्थ्यांना कृतीयुक्त व आनंददायी शिक्षण देऊन सर्व शिक्षकांनी आपापल्या शाळेच्या गुणवत्ता वाढीसाठी सतत प्रयत्नशील राहावे असे आवाहन पंचायत समिती शिक्षण विभागाचे ज्येष्ठ विषयतज्ञ त्रिंबक फपाळ यांनी केले. हातगाव केंद्रातील सर्व प्राथमिक शिक्षकांची केंद्रस्तरीय दुसरी शिक्षण परिषद शुक्रवारी (दि.२५) केंद्रप्रमुख बाबासाहेब केदार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या वेळी मार्गदर्शन करताना फपाळ बोलत होते.

यावेळी  चौथीच्या विद्यार्थिनींनी समुहनृत्यातून स्वागत गीत सादर केले. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामेश्वर घुले, सखाराम सातपुते, भाऊराव जावळे, भानुदास गुंजाळ, सुखदेव डेंगळे, कनलाल जवरे, विकास मंडळाचे विश्वस्त दत्तू फुंदे, शिक्षकनेते बाबासाहेब तांबे, सचिन वांढेकर यांच्यासह हातगाव केंद्रातील जिल्हा परिषदेच्या १९ शाळा व ५ माध्यमिक विद्यालयातील शिक्षक या वेळी उपस्थित होते. यावेळी फपाळ म्हणाले, गटशिक्षणाधिकारी तृप्ती कोलते यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात दर महिन्याला केंद्रस्तरीय शिक्षण परिषदांचे आयोजन करण्यात येत आहे.

शिक्षण परिषदेच्या निमित्ताने महिन्यातून एक दिवस केंद्रातील सर्व शिक्षकांनी एकत्रित यावे व शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रमांची चर्चा व विचार मंथन करावे असा शिक्षण विभाग व डायट यांचा हेतू आहे. शिक्षण परिषदेतील मार्गदर्शनाचा सर्व शिक्षकांनी आपापल्या शांळात अध्यापनासाठी उपयोग करून वर्गातील व शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण द्यावे असे आवाहन त्यांनी केले. निरक्षर व शाळा बाह्य विद्यार्थी सर्व्हेक्षण ३१ ऑगस्ट पर्यंत सर्वांनी पुर्ण करावे, अशा सुचना केंद्रप्रमुख केदार यांनी दिल्या.

या वेळी पिंगेवाडीचे मुख्याध्यापक सुखदेव शिंदे यांनी समस्या निराकरण पद्धती, संजय भालेकर यांनी गणित पेटी व त्यातील साहित्यांचा वापर तर ज्ञानेश्वर काकडे यांनी भाषा पेटीतील साहित्य व त्यांचा वापर कसा करावा याबाबत सविस्तरपणे मार्गदर्शन केले. या वेळी मयत माजी केंद्रप्रमुख भीमराव अंधारे व ज्ञानदेव बटुळे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

मुख्याध्यापक गणेश पुरूषोत्तम यांनी प्रास्ताविक केले. बाळासाहेब वाघंबरे, एकनाथ घुगे, सुंदर सोळंके, हरिभाऊ सरदार, आंबादास कांबळे, संजीवन शेलार, सत्यवान करडभाजे, श्रीमती मनिषा हरेल आदींनी परिषदेच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. विष्णू वाघमारे यांनी सुत्रसंचलन केले, भीमराव बामदळे यांनी आभार मानले.