स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यानी विचारला तहसीलच्या सेवेबाबत जाब

शेवगाव प्रतिनिधी, दि. ८ : शेवगाव तालुक्यातील अनेक शेतकऱ्याना प्रधान मंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या १४ व्या हप्त्याची रक्कम अद्याप मिळाली नसल्याच्या तक्रारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे आल्याची माहिती स्वाभिमानीचे जिल्हा उपाध्यक्ष दता  फुंदे, जिल्हा संघटक संतोष गायकवाड यांनी दिली.

 तक्रारीची दखल घेत त्यांनी पिडीत शेतकऱ्यासमवेत तहसील कार्यालयातील संबधित विभागात या बाबत विचारणा केली. शिवाय अशा शेतकऱ्याच्या पात्रतेतील तृटी बाबत आपणा कडून कोणत्या प्रकारची मदत त्यांना करण्यात आली याचा जाब ही विचारला. संबंधित कर्मचार्‍याकडून समाधान कारक उत्तर मिळाले नाही.

       शेवगाव तालुक्यात प्रधान मंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या पहिल्या हप्त्याचा ६४ हजार ३०८ शेतक्यांना लाभ मिळाला होता तर १३वा हप्ता १५ हजार ७१२ शेतकर्यांना मिळाला. १४व्या हप्त्याची रक्कम २७ जुलै रोजी शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग करण्यात आली. मात्र यावेळी तर मोठ्या संख्येने तालुक्यातील शेतकरी योजनेच्या लाभापासून अद्याप वंचित असल्याची बाब स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यानी नायब तहसीलदार राविंद्र सानप यांच्या निदर्शनास आणून दिली असता सानप यांनी ई केवायसी आधार लिंक अभावी अनेक शेतकरी सन्मान निधी पासून वंचित राहिले असावेत असे सांगितले.

शेतकऱ्याच्या मदतीसाठी तहसील कार्यालयात स्वतंत्रविभाग कार्यान्वित करण्यात आला आहे. त्याठिकाणी तालुक्यातील गावोगावच्या शेतकऱ्यांची दररोज मोठी गर्दी उसळते. मात्र त्याठिकाणी तहसील कार्यालयातील जबाबदार कर्मचारी नियुक्त होणे अत्यंत आवश्यक असताना तेथे कंत्राटी कर्मचारी नियुक्त असल्याने व त्यांच्या कडून शेतक-यांना मदती ऐवजी अडवणुकीची वागणूक मिळत असल्याने याबाबात तहसीलदारांनी लक्ष घालून शेतकऱ्याना न्याय मिळून देण्याची मागणी स्वाभिमानीकडून करण्यात आली. या संदर्भात राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालक मंत्री,  खासदार, आमदार, जिल्हाधिकारी तसेच प्रान्ताधिकारी यांचे लक्ष वेधून या शेतकऱ्याना न्याय मिळणे कामी प्रसंगी रस्यावर उतरु असा निर्धार फुंदे व गायकवाड यांनी यावेळी व्यक्त केला.