अयोध्यानगरीत नळाला आले पाणी, मिठाई वाटून नागरिकांनी आनंद साजरा केला

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ७ : कोपरगाव शहरातील हद्दवाढ भागातील खडकीशेजारी असलेल्या अयोध्यानगरी येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी माजी आमदार तथा भाजप नेत्या स्नेहलताताई कोल्हे व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली या भागातील भाजपच्या माजी नगरसेविका ताराबाई गणपतराव जपे व माजी नगरसेवक संजय कारभारी पवार यांनी नगरपरिषद प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यामुळे आजपासून अयोध्यानगरी येथील नागरिकांना खडकी येथील जलकुंभातून पाणीपुरवठा सुरू झाला आहे. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला पाणी प्रश्न सुटल्याने अयोध्यानगरीतील नागरिकांनी मिठाई वाटून आनंद साजरा केला.

अयोध्यानगरी येथील नागरिकांना गेल्या अनेक वर्षांपासून पाण्याची समस्या भेडसावत होती. पूर्वी माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या शब्दावरून मौलाना मुनीर यांनी मदरसा येथील विहिरीतून खडकी आणि अयोध्यानगरी येथील नागरिकांना सुमारे १४ वर्षे मोफत पाणीपुरवठा केला. नंतर खडकी भागासाठी नगर परिषदेकडून शहरातील पाण्याच्या टाकीद्वारे पाणीपुरवठा सुरू झाला; परंतु अयोध्यानगरी येथील नागरिक मात्र पाण्यापासून वंचित होते.

अयोध्यानगरीतील नागरिकांना दररोज पाण्याची समस्या भेडसावत होती. या परिसरातील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी या भागातील भाजपच्या माजी नगरसेविका ताराबाई गणपतराव जपे आणि माजी नगरसेवक संजय कारभारी पवार यांनी माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषद प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला.

१८-२-२१०९ रोजी झालेल्या नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत माजी नगरसेविका ताराबाई जपे व  माजी नगरसेवक संजय पवार यांनी ठराव क्र.२४ द्वारे अयोध्यानगरी भागासाठी वाढीव पाईपलाईन टाकण्याची मागणी करून तसा ठराव मंजूर करवून घेतला. त्यानंतर या वाढीव पाईपलाईनचे काम लवकरात लवकर मार्गी लागावे म्हणून त्यांनी नगर परिषद प्रशासनाकडे सतत पाठपुरावा केला. अखेर हे काम पूर्ण झाले असून, आज गुरुवार (७ सप्टेंबर) पासून अयोध्यानगरी येथील नागरिकांना खडकी येथील पाण्याच्या टाकीतून पाणीपुरवठा सुरू झाला आहे. 

अयोध्यानगरी येथील पाणीपुरवठ्याचा गुरुवारी (७ सप्टेंबर) सकाळी स्थानिक ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते आणि माजी नगरसेविका ताराबाई जपे व माजी नगरसेवक संजय पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. यावेळी अयोध्यानगरी भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अयोध्यानगरी येथील अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला पाण्याचा प्रश्न सुटल्यामुळे या भागातील नागरिकांनी मिठाई वाटून आनंद साजरा केला. तसेच माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे व युवा नेते विवेक कोल्हे व नगरपरिषद प्रशासनाचे आभार मानले.

त्याचबरोबर जुना प्रभाग क्र.१ मधील समतानगर भागातील घुमरे यांचे घर ते संचेती यांचे घर ते मोरे यांचे घर या रस्त्याचे काम अनेक दिवसांपासून प्रलंबित होते. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. या रस्त्याच्या कामासाठी माजी नगरसेविका ताराबाई जपे व माजी नगरसेवक संजय पवार यांनी माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे व युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषद प्रशासनाकडे पाठपुरावा केला. या रस्त्याचे कामही मार्गी लागले असून, गुरुवारी या रस्त्याच्या सिमेंट कॉँक्रिटिकरण कामाचा शुभारंभ स्थानिक ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते आणि माजी नगरसेविका ताराबाई जपे व माजी नगरसेवक संजय पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. 

कोपरगाव शहरालगतच्या त्रिशंकू भागाचा नगर परिषद हद्दीत समावेश करण्यासाठी सन २०१४ ते २०१९ या काळात राज्यात भाजप-शिवसेना युतीचे सरकार सत्तेवर असताना तत्कालीन आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्यामुळे पूर्वी ग्रामीणमध्ये असलेला हा त्रिशंकू भाग कोपरगाव नगर परिषद हद्दीत समावेश करण्याचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. या हद्दवाढ भागातील नागरिकांना रस्ते, पाणी, वीज, गटारी व इतर मूलभूत सोयी-सुविधा पुरविण्यासाठी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांच्या विशेष प्रयत्नामुळे शासनाने नुकताच १० कोटींचा निधीदेखील मंजूर केला आहे. या निधीतून या भागात विविध विकासकामे होत असल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.