विज्ञान प्रदर्शनामुळे भावी वैज्ञानिक घडतील – तहसीलदार  सांगडे

 शेवगाव प्रतिनिधी, दि.२३: शालेय स्तरावरील गणित विज्ञान प्रदर्शनामुळे भावी वैज्ञानिक तयार होत असतात. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानवादी दृष्टिकोन जागृत व्हावा या उद्देशाने शालेय तालुक्यापासून राज्यस्तरापर्यंत गणित-विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. असे सांगून विद्यार्थ्यांनी अंधश्रद्धेला आळा घालून वैज्ञानिक दृष्टिकोन आत्मसात करायला हवा. असे आवाहन तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी केले. येथील आबासाहेब काकडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजित गणित-विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी शनिवारी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.भारत वीरकर होते.

माजी जि.प.सदस्या हर्षदा काकडे म्हणाल्या, विद्यार्थ्यांना लहान वयापासूनच शालेय स्तरावर गणित-विज्ञान प्रदर्शनामध्ये सहभागी होण्याची संधी मिळते. या संधीचे विद्यार्थ्यांनी सोने करावे. तसेच शालेय प्रदर्शनामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवल्यास अनेक शास्त्रज्ञ या देशाला मिळतील. पर्यवेक्षिका पुष्पलता गरुड यांनी प्रास्ताविक केले.

प्रदर्शनामध्ये एकूण गणित व विज्ञान विषयाचे मिळून ३०५  उपकरणे, उत्कृष्ट मॉडेल्स याचे सादरीकरण केले. विजेत्या बालवैज्ञानिकांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी विद्यालयात चालवल्या जाणाऱ्या आय.बी.टी. विभागामार्फत आरोग्यदायी भेळ, पाणीपुरी, वडापाव, याचे स्वनिर्मित स्टॉल लावण्यात आले होते. या उपक्रमांमधून  अवघ्या तीन तासात ३५ हजार रुपयांची कमाई झाली. या सर्व विद्यार्थ्यांना विज्ञान-गणित शिक्षक अविनाश भागवत, पर्यवेक्षिका पुष्पलता गरुड, रागिणी लबडे, वैशाली धोंडे, सुरज लबडे, स्मिता खळेकर, विकास भोसले, भानुदास बांडे, योगेश तायडे, स्वाती शहाणे, ऋतुजा बडे, योगिता औटी, स्वाती गरड यांचे मार्गदर्शन लाभले.