शेवगाव प्रतिनिधी, दि . १४ : तालुक्यातील बहुतेक गावामध्ये गोवंशीय पशुधना मध्ये लम्पी चर्मरोगाचा प्रादूर्भाव वाढल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार शेतक-यास जनावरे एकत्र करण्यास केलेल्या मनाई मुळे शेवगाव शहर व ग्रामिण परिसरात गोपालक शेतकऱ्यानी आपापल्या वस्तीवर घरीच आपल्या पशुधनाचे पूजन करून बैलपोळा साध्या पद्धतीने साजरा केला.
गेल्या काही वर्षात वाढत्या यांत्रिकीकरणामुळे तालुक्यात पशुधनाची संख्या कमालीची घटली आहे. त्यातच यंदा परिसरात अत्यल्प पाऊस झाल्याने दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. तरीही वर्षभर बळीराजाच्या खांदयाला खांदा देऊन इमाने इतबारे प्रामाणीकपणे शेतीत राबणाऱ्या आपल्या सर्जाराजा बद्दल कृतज्ञता व्यक्त करतात.
श्रावणी बैल पोळा भारतीय संस्कृती नुसार सर्जा राजाला देवता मानुन त्याचे विधीवत पुजन करतो उधार उसणवार करुन साज शृगार झुली गोंडे घागर माळा रंग बेरंगी रंगाची उधळण करून शेतकरी राजा आपला आनंद द्विगुणीत करतो. मात्र या वर्षी अस्मानी संकटामुळे एरव्ही बैल पोळ्या साठी होणारी लाखोची उलाढाल यावर्षी मंदावली.
तालुक्यातील अनेक गावात गोवर्ग जनावरात लम्पी संसर्गजन्य चर्मरोग पसरला आहे. त्यामुळे लम्पी विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने संपूर्ण अहमदनगर जिल्हा बाधित व सतर्कता क्षेत्र म्हणून जाहीर केला आहे. त्यानुसार शेवगाव व बोधेगावचा बैलबाजार तूर्त बंद करण्यात आले असून तालुक्यातील कोणत्याही गावात यंदाचा सार्वजनिक पोळा सण पशुधन एकत्रित करून साजरा झाला नाही.
आज पोळ्या निमित्त तालुक्यातील तळणी येथील श्रीकृष्ण गोशाळेत गोमातेचे पूजन करण्यात आले. यावेळी उपस्थित गोभक्तानी गोशाळेतील गाईसाठी चारा देऊन स्नेह भाव जपला. ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे चेअरमन माजी आमदार डॉ.नरेद्र पाटील घुले यांनी दहिगावने येथे आपल्या बैल जोडीची विधीवत पूजा करून परिसरातील शेतकऱ्यांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करुन सर्वा समवेत स्नेहभोजनाचाही आनंद घेतला.