शेवगाव प्रतिनिधी, दि. १४ : तालुक्यातील वाघोलीने, माझी वसुंधरा अभियानात राज्यात सलग दोनदा अव्वल येऊन तब्बल तीन कोटीचे पुरस्कार मिळवले असल्याने हा आदर्श तालुक्यातील इतर गावांनी घ्यायला हवा. गावोगावच्या सरपंच, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक व पदाधिकार्यानी येथे येऊन वाघोलीच्या प्रगतीचे रहस्य समजून घेऊन त्याचे अनुकरण करावे असे आवाहन गट विकास अधिकारी राजेश कदम यांनी केले.
तालुक्यातील माझी वसुंधरा फेम आदर्श गाव वाघोली येथे ‘उमेद’ अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान वसुंधरा महिला ग्रामसंघ कार्यालयाचे उद्घाटन गटविकास अधिकारी कदम यांचे हस्ते, स्टेट बँक ऑफ इंडिया ढोरजळगावचे शाखाधिकारी साठे यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी (दि १३ ) करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी युवा कार्यकर्ते उमेश भालसिंग, फिरोज सय्यद, दिपक आवांतकर, सीआरपी शारदा भालसिग उपस्थित होत्या. यावेळी स्टेट बँक शाखाधिकारी साठे म्हणाले, महिला मूलतः अत्यंत व्यवहारी असतात. त्या कधीही घेतलेले कर्ज थकवीत नाहीत आणि येथे तर संस्कारीत वाघोलीचे महिला बचत गट आहेत. त्यामुळे स्टेट बॅके द्वारे येथील महिला बचत गटाला आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल.
त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते माझी वासुधरा ४.० या अभियानांतर्गत स्वर्गभूमीमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शारदा भालसिंग यांनी केले. सुत्रसंचालन ग्रामपंचयत सदस्य राजेंद्र जमधडे यांनी तर संतोष आल्हट यांनी आभार मानले. यावेळी महिला बचत गटाच्या अधक्षा, सचिव, सदस्या, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.