चंदनशिव यांच्या उपोषणाला यश येण्याचा मार्ग मोकळा
कोपरगाव प्रतिनिधी, दि. १५ : कोपरगाव शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे शासकीय अनावरण त्वरित करावे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे खुले नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचे काम तातडीने चालू करावे, या मागण्यांसाठी सत्यशोधक लहुजी क्रांती सेनेचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष फकिरा चंदनशिव यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणास संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी आज भेट देऊन त्यांच्याशी चर्चा केली.
बिपीनदादा कोल्हे यांच्या सूचनेवरून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे खुले नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचे काम दोन दिवसात सुरू करण्याचे आश्वासन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी दिले. त्यास उपोषणकर्ते फकिरा चंदनशिव व समाजबांधवांनी सहमती दर्शवली. त्यामुळे बिपीनदादा कोल्हे यांच्या मध्यस्थीने फकिरा चंदनशिव यांच्या उपोषणाला यश येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
कोपरगाव शहरात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक उभारण्यात आले आहे. या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुर्णाकृती पुतळा उभारून अनेक दिवस उलटले तरीही शासनामार्फत अद्याप या पुतळ्याचे अनावरण करण्यात आलेले नाही. तसेच शहरातील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे खुले नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचे काम गेल्या अनेक दिवसांपासून रखडले आहे.
नगरपरिषद प्रशासनाने खुले नाट्यगृहाच्या नूतनीकरणाच्या कामासाठी जून २०२१ मध्ये ठेकेदारास कार्यारंभ आदेश दिलेला आहे; पण संबंधित ठेकेदाराने अद्यापही हे काम पूर्ण केलेले नाही. त्यामुळे नगरपरिषद प्रशासनाने तातडीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे शासकीय अनावरण करावे व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे खुले नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचे काम चालू करावे.
या मागण्यांसाठी सत्यशोधक लहुजी क्रांती सेनेचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष फकिरा चंदनशिव यांनी मंगळवार (१२ सप्टेंबर) पासून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. माजी आमदार तथा भाजप नेत्या स्नेहलताताई कोल्हे यांनी बुधवारी रात्री फकिरा चंदनशिव यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी शासनदरबारी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
त्यानंतर आज शुक्रवारी (१५ सप्टेंबर) संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन फकिरा चंदनशिव यांच्याशी चर्चा केली. तसेच नगर परिषदेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांना तात्काळ उपोषणस्थळी बोलावून घेऊन फकिरा चंदनशिव यांच्या मागण्यांबाबत त्वरित सन्मानजनक तोडगा काढण्याची सूचना केली. त्यावर गोसावी यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे खुले नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचे काम येत्या दोन दिवसात सुरू करण्यात येईल, असे सांगितले.
त्यास उपोषणकर्ते फकिरा चंदनशिव व समाजबांधवांनी होकार दर्शवला. त्यानंतर मुख्याधिकारी शांताराम गोसावी, बांधकाम अभियंता फुलारी, समाजबांधव व भाजप कार्यकर्त्यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे खुले नाट्यगृहाची प्रत्यक्ष पाहणी करून प्राधान्याने करावयाच्या कामांचा आराखडा तयार केला. यामध्ये खुले नाट्यगृहाच्या दक्षिण भागात नवीन खिडकी बसवून दुरुस्ती करणे, नवीन स्वच्छतागृह बांधणे, नवीन प्रवेशद्वार उभारणे, नवीन फरशा टाकून बैठक व्यवस्था करणे, स्टेजवर भर टाकून कोटा फरशी बसवणे, स्टेजवर नवीन पत्रे टाकणे, नाट्यगृहातील दोन्ही चेंजिंग रूम दुरुस्त करणे, संपूर्ण लाईट फिटिंग नव्याने करणे, सर्व दरवाजे व खिडक्या बदलणे, नाट्यगृहाला आतून व बाहेरून रंगकाम करणे, स्टेटजवरील दोन्ही उभ्या पडद्या दुरुस्त करणे, संपूर्ण नाट्यगृह परिसराचे सुशोभिकरण करणे आदी कामे करण्याचे यावेळी ठरले.
यावेळी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संचालक विश्वासराव महाले, बाळासाहेब वक्ते, रमेश घोडेराव, अमृत संजीवनी शुगरकेन ट्रान्सपोर्ट कंपनीचे अध्यक्ष पराग संधान, भाजपचे शहराध्यक्ष डी. आर. काले, माजी सभापती सुनील देवकर, भाजयुमोचे शहराध्यक्ष अविनाश पाठक, विजय आढाव, माजी नगरसेवक बबलू वाणी, आर. डी. सोनवणे, संदीप देवकर, दीपक वाजे, राजेंद्र लोखंडे, सुखदेव जाधव, राजेंद्र बागुल, गोपीनाथ गायकवाड, संतोष नेरे,सोमनाथ म्हस्के, खलिकभाई कुरेशी, अल्ताफभाई कुरेशी,
सतीश रानोडे, अनिल जाधव, रवींद्र शेलार, शंकर बिऱ्हाडे, अर्जुन मोरे, अर्जुन मरसाळे, देविदास रोठे, गोरख देवडे, जयवंत मरसाळे, सुजल चंदनशिव, विजय चव्हाणके, संतोष साबळे, रामचंद्र साळुंके, समीर गवळी, सलीम अत्तार, टिलू पठाण आदींसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण लवकरच शासकीय पद्धतीने करण्यात येईल. त्यासंदर्भात समाजबांधवांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी यावेळी बिपीनदादा कोल्हे यांच्या उपस्थितीत दिले.