शेवगाव प्रतिनिधी, दि.०३ : शेवगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी मागील गळीत हंगामात विविध साखर कारखान्यांना मोठ्या प्रमाणात ऊस पुरवठा केला आहे. यावर्षी परिसरात दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाल्याने ऊस उत्पादनाला मोठा फटका बसणार आहे. अशा स्थितीत परिसरातील साखर कारखान्यांनी तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दसरा – दिवाळीसाठी दुसरा हप्ता देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करा.
अशा मागणीचे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय फुंदे यांनी परिसरातील साखर कारखान्यांसह साखर उपायुक्त कार्यालयाला दिले आहे. याबाबत चालढकल दिसून आल्यास जो कारखाना शेतकऱ्यांना मदत करील त्या कारखान्यांस आपला ऊस देण्याबाबत जनजागृती मोहीम राबावण्याचा निर्धार फुंदे यांनी दिलेल्या निवेदनात व्यक्त केला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, देश व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेला उच्चंकी दर मिळत असून सर्वत्र चांगली मागणी असल्याने साखर कारखान्यांना ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफ. आर. पी. पेक्षा जास्त भाव देणे सहज शक्य आहे. तसेच परिसरातील साखर कारखान्यांनी उपपदार्थापासून मिळणारा नफा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अद्याप कधीही दिलेला नाही, ही वस्तुस्थिती आहे.
यंदा पावसाअभावी उस उत्पादनात मोठी घट येण्याची परिस्थिती निर्माण झाली असून अन्य खरिप पिकांनी देखील दगा दिला आहे. म्हणून येऊ घातलेल्या दसरा दिवाळीसाठी तालुक्यातील ऊस शेतकऱ्यांना पेमेंटचा दुसरा हप्ता जमा करणे अत्यंत आवश्यक असून परिसरातील साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या संकटप्रसंगी त्यांना आर्थिक सहकार्य करण्याची गरज आहे.
परिसरातील ज्ञानेश्वर, केदारेश्वर, वृद्धेश्वर या साखर कारखान्यांच्यावार्षिक सर्वसाधारण सभा नुकत्याच पार पडल्या, या सभेत शेतकरी हितासाठी अधिक पेमेंटची घोषणा होईल अशी अपेक्षा होती. मात्र त्या सभेत उसाच्या दराबाबत काहीही घोषणा झाली नाही. याशिवाय गंगामाई साखर कारखान्यानेही दिवाळी दसर्या बाबत अद्याप तरी कोणताही सकारात्मक निर्णय जाहीर केलेला नाही.
तरी या सणांचे औचित्य साधून परिसरातील साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना न्याय देण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे. निवेदनाच्या प्रती पुणे व अहमदनगर येथील साखर उपायुक्त कार्यालयासह राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील व अन्य संबंधितांना पाठवण्यात आल्या आहेत.