शेवगाव प्रतिनिधी, दि.०५: तालुक्यातील बोधेगाव, बालमटाकळी, आव्हाने बुद्रुक, लाडगाव जळगाव, मुंगी आदि मोठ्या २७ ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने ऐन दिवाळीत त्या गावचे राजकीय वातावरण तापू लागले आहे. या ग्रामपंचायतीच्या सरपंचाची निवड थेट जनतेतून होत असल्याने या निवडणुका अत्यंत चुरशीच्या होणार असून या निमित्ताने तालुक्याच्या ग्रामिण भागाचे राजकारण ढवळून निघणार आहे.
राज्य शासनाच्या १५ व्या वित आयोगाचा विकास निधी सध्या थेट गावच्या ग्रामपंचायतीकडे येत असल्याने ग्रामपंचायतींच्या निवडणुकांना मोठे महत्व प्राप्त झाले आहे. यानिमित्ताने गावातील युवकांचा गावकीच्या निवडणुकीत सहभाग वाढत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाचा तालुक्याच्या राजकारणावर थेट परिणाम होत असल्याने सर्वच राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यांचे लक्ष या निवडणुकीवर असते.
स्थानिक राजकारणावर मजबूत पकड रहावी यासाठी सर्व पक्षातील नेते मडळी तसेच आगामी निवडणुकीवर डोळा असणाऱ्यांचे गाव पातळीवरील निवडणुका वर विशेष लक्ष असते. म्हणून सरपंच पदासाठी आरक्षित असलेल्या जागेसाठी प्रभावी लोकसंपर्क असलेल्या स्थानिक कार्यकर्त्यांचा शोध घेऊन तगड्या मंडळाच्या माध्यमातून निवडणुकीसाठी समर्थक कार्यकर्त्यांशी चर्चा, बैठकाच्या माध्यमातून निवडणुका होणाऱ्या गावाचे राजकारण ढवळून निघत आहे.
या निवडणुकीसाठी २७ ग्रामपंचायतीच्या ९४ प्रभागात २२० जागासाठी मतदान होणार असून २९ हजार ६६५ पुरुष, २६ हजार ६६६ महिला मिळून एकूण मतदारांची संख्या ५६ हजार ३३१ आहे. या निवडणुकीसाठी १६ ते २० ऑक्टोबर उमेदवारी अर्ज दाखल करणे. २३ ऑक्टोबर छाननी, २५ ऑक्टोबर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत, ५ नोव्हेबरला मतदान तर ६ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.
निवडणुक होणाऱ्या ग्रामपंचायती व तेथील सरपंचाचे आरक्षण पुढील प्रमाणे – आव्हाणे बु. (अनुसुचित जाती) लाखेफळ (अनुसुचित जाती महिला) ब – हाणपूर, लोळेगाव, वडुले बु, थाटे, मुंगी, भगुर, गोळेगाव, खडके, वडुले खु. व एरंडगाव समसुद – (सर्व साधारण महिला), सामनगाव, लाडजळगाव, वरुर बु, मडके, हिगणगावने, दोरसडे, आंत्रे, देवटाकळी व खरडगाव – (सर्वसाधारण) भागवत एरंडगाव, दिवटे, बालम टाकळी, बोधेगाव, क -हेटाकळी व शेकटे खुर्द – (नामा प्र) या शिवाय जूनी खाम पिंपरी, दहिगाव शे व रावतळे, कुरुडगाव या तीन ग्रामपंचायतीच्या प्रत्येकी एका जागेची पोटनिवडणूक याचवेळी होणार आहे.