शेवगाव प्रतिनिधी, दि. १२ : केंद्र सरकारच्या “मेरी माटी मेरा देश “उपक्रमांतर्गत गुरुवारी शेवगावातून पंचायत समितीच्या वतीने लेझीम व ढोल ताशाच्या गजरात भव्य अमृत कलश यात्रा काढण्यात आली. यावेळी विविध वेशभूषा केलेले विद्यार्थी मिरवणुकीच्या अग्रभागी होते. प्रारंभी पंचायत समिती सभागृहात विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. त्यानंतर अमृत कलश यात्रा शहराच्या मुख्य रस्त्याने क्रांती चौक व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे पुन्हा पंचायत समिती कार्यालय प्रांगणात आली. कलश यात्रेत जागोजागी नागरिकांनी कलशाला अभिवादन केले.
शेवगाव तालुक्यातील विविध गावांमध्ये ग्रामपंचायत व शालेय पातळीवर अमृत कलश यात्रा काढून ते कलश पंचायत समिती मध्ये एकत्रीत करण्यात आले. त्यानंतर या सर्व गावातील मातींचा समावेश असलेल्या कलशाची पूजा करून अमृत कलश यात्रा काढण्यात आली. यावेळी स्वातंत्र्य सैनिकांना आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी गटविकास अधिकारी राजेश कदम म्हणाले, “मेरी माटी मेरा देश” हेअभियान, ज्या मातीने गुलामगिरी सोसून स्वातंत्र्याचे दिवस दाखविले तीच्या ऋणाचे स्मरण करण्यासाठी आहे. तिचा सन्मान व गौरव म्हणून कलश यात्रेद्वारे संपूर्ण भारत वर्षातील माती देशाच्या राजधानीत एकत्रित करण्यात येणार आहे. देशासाठी ज्यांनी बलिदान दिले अशा वीरांना वंदन करून आपण स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करतो आहोत.
सहाय्यक गटविकास अधिकारी दीप्ती गाठ म्हणाल्या, या अभियानाचा महत्वाचा उद्देश म्हणजे ज्या वीरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी रक्त सांडले. त्या वीरांना वंदन करायचे आहे. त्यांचे उपकार आपण फेडू शकत नाही. आपण नेहमी त्यांच्या ऋणात राहू आणि त्याची जाणीव ठेवून आपल्या कामातून देशाची सेवा करू यावेळी गट शिक्षणाधिकारी तृप्ती कोलते, विस्तार अधिकारी सचिन भाकरे, मेजर भाऊसाहेब शिंदे, बापू चव्हाण, मच्छिंद्र मगर, यांच्यासह सर्व प्रशासकीय अधिकारी व स्वयंसेवक व विद्यार्थी उपस्थित होते. कल्याण मुटकुळे यांनी खुमासदार सुत्रसंचलन केले.