कोपरगाव प्रतिनिधी, दि.१६: सहकार क्षेत्रात अग्रेसर असलेल्या सहजानंदनगर (ता. कोपरगाव) येथील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यास नवभारत वृत्तपत्र समूहाच्या वतीने देण्यात येणारा सन २०२२-२३ मधील ‘सर्वोत्कृष्ट कार्यक्षमता पुरस्कार’ राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, माजी महसूलमंत्री तथा ज्येष्ठ काँग्रेस नेते आ. बाळासाहेब थोरात व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांमधून सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याला हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
मुंबई येथे गुरुवारी (१२ ऑक्टोबर) ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये नवभारत ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक निमिष माहेश्वरी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या वतीने संचालक विश्वास महाले व सरव्यवस्थापक (साखर) शिवाजी दिवटे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
यावेळी सहकारमंत्री दिलीप वळसे, माजी महसूलमंत्री आ.बाळासाहेब थोरात व खा.सुनील तटकरे यांनी माजी मंत्री सहकारमहर्षी स्व.शंकरराव कोल्हे यांनी सामाजिक, राजकीय, सहकार, कृषी, शिक्षण, साखर कारखानदारी, सिंचन आदी क्षेत्रात केलेल्या कामगिरीचा गौरव केला. तसेच संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली व कारखान्याचे तरुण, अभ्यासू अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली या कारखान्याची यशस्वी घोडदौड सुरू असल्याबद्दल संचालक मंडळाचे व व्यवस्थापनाचे अभिनंदन केले.
माजी मंत्री सहकारमहर्षी स्व. शंकरराव कोल्हे यांनी स्थापन केलेला सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखाना हा राज्यातील एक आदर्श सहकारी साखर कारखाना म्हणून सर्वपरिचित आहे. स्व. शंकरराव कोल्हे यांनी ग्रामीण अर्थकारणाला बळकटी देण्यासाठी १९६० साली सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याची (पूर्वीचा संजीवनी सहकारी साखर कारखाना) मुहूर्तमेढ रोवली. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याने अनेक पायलट प्रकल्प सुरू करून इतर साखर कारखान्यांना सातत्याने मार्गदर्शन केले आहे. संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याची यशस्वी वाटचाल सुरू आहे.
देशपातळीवर कारखान्याने मोठा नावलौकिक मिळवलेला असून, आजवर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, नॅशनल शुगर इन्स्टिट्यूट यासारख्या नामवंत संस्थांसह देश व राज्य पातळीवरील २५ हून अधिक पुरस्कार कारखान्याने पटकावले आहेत. नवभारत समूहाच्या वतीने कारखान्याला ‘सर्वोत्कृष्ट कार्यक्षमता पुरस्कार’ मिळाल्याने आपल्याला खूप आनंद झाला आहे. हा पुरस्कार कारखान्याचे संस्थापक स्व.शंकरराव कोल्हेसाहेब, सर्व भागधारक सभासद, ऊस उत्पादक शेतकरी व कारखान्याच्या प्रगतीत साथ देणाऱ्या ज्ञात-अज्ञात बांधवांना समर्पित करतो, असे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी संगितले.
आर्थिक काटकसर, सुयोग्य नियोजन, शिस्त, आधुनिक तंत्रज्ञानाचा कार्यक्षमतेने वापर यावर भर देत उसापासून साखर उत्पादन व त्यातून उपपदार्थाबरोबरच इथेनॉल, सहवीज निर्मिती करत असतानाच आता पॅरासिटामॉल या औषधी उत्पादन प्रकल्पाची उभारणी कारखान्याने केली आहे. यावर्षीच्या गळीत हंगामापासून कारखान्याची गाळप क्षमता ६ हजार मेट्रिक टनापर्यंत वाढविली असून, त्यामध्ये ४७०० मेट्रिक टन साखर निर्मिती व १३०० मेट्रिक टन रसापासून इथेनॉल निर्मिती करण्यात येणार असून, त्याशिवाय बायो अॅसेटिक अॅसिड उत्पादन, डिस्टीलरी स्पेंट वॉशपासून सीबीजी व पोटॅश खत निर्मिती करण्यात येणार आहे. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने देशात प्रथमच डायबेटिस फ्री शुगर निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे.
कारखान्याच्या कार्यक्षेत्रात एकरी ऊस उत्पादन वाढविण्यासाठी कारखान्याने धडक कार्यक्रम हाती घेतला असून, सभासद शेतकऱ्यांना उसाच्या सुधारित जातीचे बेणे व तांत्रिक मार्गदर्शन कारखान्याच्या वतीने उपलब्ध करून दिले जात आहे. शेतकऱ्यांना फवारणीसाठी ड्रोन सुविधा, महिंद्र अॅण्ड महिंद्र कंपनीच्या सहकार्याने उपग्रहाद्वारे उसाच्या प्लॉटची एकरी टनेज व साखर उतारा आदी माहिती संकलनाबरोबर ३ डब्ल्यू. डी. अॅपद्वारे ऊस नोंदणी, वजन अशा पद्धतीचे अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरणारा हा राज्यातील पहिलाच साखर कारखाना आहे.
स्व. शंकरराव कोल्हेसाहेब यांनी हयातभर शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून सहकार चळवळ व साखर कारखानदारी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपली. कारखान्याचा नावलौकिक सर्वदूर वाढविला. स्व. कोल्हेसाहेबांच्या सामाजिक कार्याचा वसा घेऊन आम्ही पुढे वाटचाल करत असून, त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही विवेक कोल्हे यांनी दिली.