शेवगाव प्रतिनिधी, दि.१६ : दिवंगत माजी राजीव राजळे यांच्या पुण्यस्मरण निमित्त नवरात्रोत्सवाची पर्वणी साधून येथील राजीव राजळे मित्रमंडळ आयोजित श्रीरामकथा सप्ताहाचा प्रारंभ सोमवार पासून होत असून त्याचे ध्वजपूजन गुरुवर्य श्री क्षेत्र देवगडचे महंत भास्करगिरीजी महाराज, भगवान गडाचे महंत न्यायाचार्य डॉ. नामदेव महाराज शास्त्री, ओग महाराज संस्थानचे प्रवर्तक राम महाराज झिंजूर्के, येळेश्वर संस्थानचे महंत ह.भ.प. रामगिरी महाराज, श्री क्षेत्र वरुरचे भागवताचार्य दिनकर महाराज अंचवले यांचे शुभहस्ते पंचक्रोशीतील संतमहत व मान्यवराच्या उपस्थितीत पूजन करण्यात आले.
यावेळी गुरुवर्य भास्करगिरी महाराज म्हणाले, श्रीराम कथा हा अतिशय चांगला उपक्रम असून ह.भ.प. रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांचे सुस्राव्यवाणीतून भाविकांना ऐकावयास मिळणार असून हा दुग्ध शर्करा योग सर्वांनी साधावा. आयोध्येतील राम मंदिराने पाचशे वर्षे वनवास भोगला आहे, परंतु आता राम मंदिराची निर्मिती होत आहे. लवकरच उषाकाल होणार असून आपणा सर्वांसाठी मंदिर खुले होणार आहे.
जगाच्या कानाकोपऱ्यातील भाविका येथे दर्शनासाठी येऊ शकतो. यासाठी आवश्यक त्या सोयी सुविधाही तेथे उपलब्ध अगोदरच करण्यात आल्या आहेत. आमदार मोनिका राजळे यांनी श्रीराम कथा सप्ताहाची अतिशय चांगली तयारी केली आहे. धार्मिक कार्य करणाऱ्यांच्या पाठीशी संतांचे आशीर्वाद कायमच असतात.
येथील खंडोबानगरात अतिशय भव्य दिव्य अशी अयोध्यानगरी उभारण्यात आली असून २००x २५० असा तब्बल पन्नास हजार चौरस फुटाचा वाटरप्रुफ शामियाना उभारण्यात आला आहे. श्री रामकथा स्थळी ध्वज पूजन करून श्रीराम कथा सप्ताहास प्रारंभ करण्यात आला. आज पहिल्या दिवशी ग्रंथ महात्म्य – शिव पार्वती विवाह, तर श्रीराम जन्म कथा, सीता स्वयंवर कथा, केवट कथा, भरत भेट, लंका दहन, व रावण दहण व श्रीराम राज्याभिषेक याप्रमाणे श्रीराम कथा कार्यक्रम होणार आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या कथेचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार मोनिका राजळे यांनी केले आहे.