कोपरगाव प्रतिनिधी, दि.१९ : के.जे. सोमैया (वरिष्ठ) व के.बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयाला केंद्र सरकारच्या जैव तंत्रज्ञान विभाग, विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय नवी दिल्ली यांचेकडून स्टार कॉलेज योजनेअंतर्गत अनुदान मान्यता मिळाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस. यादव यांनी दिली आहे. शैक्षणिक गुणवत्तेच्या जोरावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात नावलौकिक मिळविलेल्या के. जे. सोमैया महाविद्यालयाला बंगलोर स्थित नॅक संस्थेने दोन वेळा ‘अ’ श्रेणी देऊन गौरवान्वित केलेले असून विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या गेलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ‘उत्कृष्ट महाविद्यालय’ म्हणुन पुरस्कृत केलेले आहे.
महाविद्यालयातील क्रिडा विभागाच्या अनेक विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर नैपुण्य प्राप्त केलेले असून अक्षय आव्हाड या विद्यार्थ्यास महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती राज्य क्रिडा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या या महाविद्यालयाने संशोधन, विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात घेतलेली भरारी सर्वांचेच डोळे दिपवून टाकणारी आहे. शैक्षणिक क्षेत्रात दिलेल्या भरीव योगदानाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे.
शिवाय महाविद्यालयातील अनेक प्राध्यापकांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पुरस्कार देऊन सन्मानित केलेले आहे. तसेच विज्ञान व तंत्रज्ञान शाखेतील अनेक प्राध्यापकांनी आपल्या विषयात भारत सरकारचे पेटेंट ही मिळविलेले आहे. महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या वतीने शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी सातत्याने प्रयत्न केले जातात, त्याचाच एक भाग म्हणून फॅकल्टी एक्सचेंज व स्टुडन्ट एक्सचेंज प्रोग्राम हे आंतरराष्ट्रीय स्तरावर राबविण्यात आलेले आहे.
तसेच राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक संस्थेशी सामजस्य करार झालेले आहे. महाविद्यालयाने रोजगाराभिमुख अनेक कोर्सस सूरू केलेले असुन अनेक विषयात पीच-डी रिसर्च सेंटर सुरू झाले आहे. या रिसर्च सेंटरमध्ये एकुण १७० पेक्षाही अधिक विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश नोंदविलेला आहे. या सर्व बाबींचा विचार करून केंद्र सरकारच्या जैव तंत्रज्ञान विभाग, विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय नवी दिल्ली यांचेकडून महाविद्यालयाला स्टार कॉलेज योजनेअंतर्गत एक करोड रुपये अनुदान मान्यता मिळाली आहे.
अनुदानाचा उपयोग विज्ञान व तंत्रज्ञान शाखेच्या विभागांना होणार असुन यामुळे विद्यार्थ्यांना अधिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध होणार आहे. महाविद्यालयाला मिळालेल्या या यशाबद्दल कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. अशोक रोहमारे, सचिव ऍड संजिव कुलकर्णी, विश्वस्त मा. संदिप रोहमारे व संस्थेचे इतर पदाधिकारी यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी यांचे अभिनंदन केले.